अर्थमंत्र्यांच्या पतीकडून मनमोहन सिंग यांचे कौतुक तर मोदी सरकारला झोडले

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
Nirmala sitharaman husband parkala prabhakar attacks on modi govt
Nirmala sitharaman husband parkala prabhakar attacks on modi govt

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. सरकार लोकांना मदत करण्याऐवजी हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यातच धन्यता मानत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान डॅा. मनमोहन सिंग यांचे कौतुक करून त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना धारेवर धरले.

परकला प्रभाकर हे नामांकित अर्थतज्ज्ञही आहेत. त्यांनी एका यूट्यूब चॅनेलच्या कार्यक्रमात केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात सरकार अपयशी ठरल्याचे सांगत ते म्हणाले, भारतात कोरोनाचा संसर्ग जगात सर्वात वेगाने वाढत आहे. मृतांचा आकडा नवे विक्रम निर्माण करत आहे. ही आरोग्याची आणीबाणी आहे. आता केंद्र सरकारची तयारी आणि जबाबदारी पाहण्याची वेळ आहे. यांना आपल्या जवळच्यांच्या मृत्यूने दु:ख होते तर इतरांचे मृत्यू केवळ आकडे वाटतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

मनमोहन सिंग यांचे कौतुक, मोदींवर टीका

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चांगला प्रस्ताव दिला होता. पण त्यावर काही केंद्रीय मंत्र्यांनी असभ्य प्रतिक्रिया दिली. त्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांचा प्रस्ताव रचनात्मक होता. आता देशासमोर जास्त काळ चुप्पी चालणार नाही. मानवता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हवे. पंतप्रधानांनी आता याचीच निवड करायला हवी. अडचणी टाकणाऱ्या प्रश्नांना सरकार उत्तर देऊ इच्छित नाही, असे प्रभाकर म्हणाले. 

त्यावेळी थाळ्या वाजवल्या जात होत्या

काही संशोधनानुसार आता ही साथ थांबणार नाही. अशा परिस्थितीत कमीत कमी 140 लशीचे डोस गरजेचे आहेत. ज्या वेळेचा उपयोग रुग्णालये आणि पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी करायला हवा होता, त्यावेळी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या जात होत्या. लोकांना मदत पोहचविण्याऐवजी सरकार हेडलाईन्स मॅनेजमेंट करत होती, अशी टीका प्रभाकर यांनी केली आहे. 

मृतांचा खरा आकडा दिला जात नाही

देशामध्ये कोरोना संकट आल्यापासून जवळपास 1 लाख 80 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. पण हे आकडे खरे नाहीत. त्याहून वास्तविक आकडे खूप अधिक आहेत. या संकटामुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. उपचार करण्यातच साठवलेले पैसे जात आहेत. अनेकजण आर्थिक संकटातून बाहेर येऊ शकत नाहीत, अशी चिंता प्रभाकर यांनी व्यक्त केली.

नेत्यांना काही फरक पडत नाही

देशात कोरोना चाचण्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. लसीकरणही धीम्या गतीने सुरू आहे. रुग्णालये आणि लॅब सँपलच घेत नाहीत. रुग्णालयांवर इतका ताण आहे की, ते वेळेत रिपोर्ट देऊ शकत नाहीत. रविवारी 3 लाख 56 हजार टेस्ट झाल्या. हा आकडा आदल्या दिवशीच्या तुलनेत सुमारे दोन लाखाने कमी आहे. स्मशानभूमीत रांगा लागल्या आहेत. बेड मिळणे कठीण झाले आहे. पण कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक नेत्याला त्याचा फरक पडत नाही, अशी जोरदार टीका प्रभाकर यांनी केली आहे.

कुंभमेळा, प्रचार सभांवर नाराजी

मुख्यमंत्री आणि पंतप्रधान प्रचार सभा घेत असल्याचे टीव्हीवर दिसत होते. गर्दी केली जात होती. कुंभमेळा सुरू आहे. स्थिती बिघडू लागल्यानंतर ते जागे होत आहेत. काही लोक आणि तज्ज्ञ या गर्दीला योग्य म्हणतात, याचे आश्चर्य वाटते. इतर देशांच्या तुलनेत आपली स्थिती चांगली आहे, असे तर्क ते लढवतात. हे ऐकून धक्का बसतो, अशी नाराजी प्रभाकर यांनी व्यक्त केली.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com