सचिन वाझेंचा अंदाज खरा ठरला...... NIA ने बारा तासांच्या चौकशीनंतर केली अटक

. सकाळी 11च्या सुमारास वाझे एनआयए कार्यालयात दाखल झाले.
sachin waze
sachin waze

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या "अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज अटक केली. तत्पूर्वी सुमारे 12 तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली. अशी अटक होण्याची शक्यता खुद्द वाजे यांना होतीच. त्यामुळेच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच आपल्यावरील जुन्या खटल्याची जखम दाखवत जग सोडून जाण्याचीही भाषा त्यांनी केली होती. 

वाझेंच्या व्हॉट्‌सऍप स्टेट्‌सने खळबळ
सचिन वाझे यांनी शनिवारी खळबळजनक व्हॉट्‌सऍप स्टेटस ठेवले होते. त्यात त्यांनी जग सोडण्याची भाषा केली होती. 3 मार्च 2004 ला सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्षे होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्षे आहेत ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली, असे वाझे यांनी व्हॉट्‌सऍप स्टेटसमध्ये म्हटले होते.

अंबानी यांच्या मुंबईतील "अँटिलिया' निवासस्थानाजवळ पार्क केलेल्या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. अंबानी यांना संदेशाद्वारे धमकीही देण्यात आली होती. कारमधील स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. वाझे या प्रकरणात तपास करत होते. त्यामुळे त्यांना याप्रकरणी चौकशीसाठी आज बोलावण्यात आले. सकाळी 11च्या सुमारास वाझे एनआयए कार्यालयात दाखल झाले. अंबानी स्फोटक प्रकरणातील तपास पथकातील गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे व श्रीपाद काळे हेही एनआयए कार्यालयात दाखल झाले होते. एनआयएच्या पथकाने तपासासह मनसुख हिरेन यांच्यासोबतच्या संबंधांबाबत चौकशी केली. कारबाबतची माहितीही घेतली. साडेनऊच्या सुमारास इतर तपास अधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन अलकनुसरे व श्रीपाद काळे एनआयए कार्यालयातून बाहेर पडले. तिघांची वेगवेगळी चौकशी करण्यात आली. काळे व अलकनुरे यांच्या चौकशीची गरज भासल्यास त्यांना पुन्हा बोलवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, चौकशीनंतर अखेर रात्री उशीरा वाझे यांना अटक करण्यात आली.


स्फोटकांप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता. त्या पथकामध्ये सचिन वाझे यांचाही समावेश होता. दरम्यान, मनसुख यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने घटनेला गंभीर वळण लागले. मनसुख यांच्या पत्नीने वाझे हेच पतीच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्याचा तपास एटीएसने करण्यास सुरुवात केली असून, त्यांनी वाझे यांचा जबाबही नोंदवला. स्फोटकांबाबत एनआयएने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा झाल्याने, त्यांनी वाझे यांना चौकशीसाठी बोलावले. वाझे यांनी यापूर्वीच ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

गावडेंचा एटीएसने जबाब नोंदवला

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्या वेळी त्यांनी आरोप केलेले धनंजय गावडे यांचा जबाबही एटीएसने गुरुवारी नोंदवला आहे. फडणवीस यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर त्याबद्दल माहिती घेण्यात आली. मनसुख हिरेन यांच्याशी संबंध, त्यांच्या मृत्यूवेळी तुम्ही कोठे उपस्थित होतात आदी मुद्‌द्‌यांची माहिती गावडे यांच्याकडून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गावडे यांनी यापूर्वीच प्रसिद्धीमाध्यमांना दिलेल्या माहितीत आपला या प्रकरणात काहीच सहभाग नसून विनाकारण आपल्याला गोवण्यात येत असल्याचा आरोप केला होता.

दुसरीकडे या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनेही "जैश उल हिंद' दहशतवादी संघटनेच्या तिहार कनेक्‍शनचा तपास सुरू केला असून त्यांचे पथक लवकरच मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, वाझे यांनी यापूर्वीच ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांना तात्काळ दिलासा दिलेला न देता यावरील सुनावणी  19 मार्च रोजी ठेवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com