...या कार्यकर्त्याला अजित पवार माफ करणार का? - NCP workers Nitin Deshmukh apologizes to Ajit Pawar-arj90 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

...या कार्यकर्त्याला अजित पवार माफ करणार का?

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होता. 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (ता.२२ जुलै) वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातील एका जाहिरातीची चर्चा राज्यभरात रंगली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने वर्तमानपत्रातून जाहीर माफी मागितली आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्यामुळे नितिन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्यासोबत अजित पवार अद्यापही बोलले नाहीत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपल्याला माफ करुन अबोला सोडावा, अशी गळ देशमुख यांनी घातली आहे. (NCP workers Nitin Deshmukh apologizes to Ajit Pawar)  

प्रकरण काय?

अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होता. या पहाटेच्या शपथविधीनंतर देशमुख यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय वाय. बी. चव्हाण येथे अजित दादांविरोधात घोषणाबाजी केली होती. देशमुख यांच्या भूमिकेबद्दल अजितदादांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा :  देखमुखांनी भाजपसाठी जे केले: ते भरणे राष्ट्रवादीसाठी करुन दाखवतील काय?

दीड वर्षांहून अधिक काळ अजितदादा देशमुखांशी अद्यापही बोलले नाहीत. त्यामुळे अजित पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशमुख यांनी दादांच्या मनधरणीचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. 'दोन हाना, पण मला आपले म्हणा, मला माफी, हेच तुमचे वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट' अशी जाहिरात दिली आहे.

कोण आहेत नितिन देशमुख?

देशमुख हे मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध बोलणारे भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडाळकर यांच्यावर देशमुख नेहमीच टीका करतात. 

काय आहेत जाहिरात?

आदरणीय दादा…
आम्ही अपराधी अपराधी
आम्हा नाही दृढ बुद्धी
तरी साहेबी पांघरले माझ्या चुकांवर पांघरुण
हात ठेवुनी मस्तकी आता द्यावा आशीर्वाद
अन् असावी आम्हावर मायेची पखरण 

हेही वाचा : यशस्वी मुख्यमंत्री अन् सक्षम विरोधी पक्षनेता...

दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक, माफ करा…
तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा
23 नोव्हेंबर 2019 रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या
दादा, मी अपरिपक्व होतो, भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली
दोन वर्षे मी स्वतःला पश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिले आहे
पण दादा, आता सहन होत नाही
संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी
आदरभाव व्यक्त करतोय, मलाही दादा आज मन मोठं करुन
आशिर्वादरुपी माफीचे रिटर्न गिफ्ट द्या. एवढीच माफक अपेक्षा
आपला कृपाभिलाषी... नितीन हिंदुराव देशमुख  

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख