भाजपच वकील, न्यायाधीश अन् हम करेसो कायदा ..ही लोकशाही आहे का? - NCP National Spokesperson Nawab Malik criticizes BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

भाजपच वकील, न्यायाधीश अन् हम करेसो कायदा ..ही लोकशाही आहे का?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 जून 2021

महाराष्ट्रातही बंगाल मॉडेल करायची भाजपची इच्छा असेल तर करावी. 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) चौकशी करावी, असा प्रस्ताव भाजप (BJP) कार्यकारिणीच्या बैठकीत नुकताच मंजूर करण्यात आला. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना (Amit Shah) यांनाच पत्र लिहून दोघांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे. (NCP National Spokesperson Nawab Malik criticizes BJP)

मलिक म्हणाले, भाजप ठरवणार, भाजप मागणी करणार, भाजपची लोकं निर्णय घेणार, भाजपची लोकं लोकांना अटक करणार, लोकांना दंड ठोठावणार, ही लोकशाही आहे का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. आम्ही बोलू तोच कायदा... आम्ही बोलू तेच होणार इतकी लोकशाहीची थट्टा होऊ शकत नाही, अशा शब्दात मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.  

हेही वाचा : फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच; त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल

भाजपने देशात ज्याप्रकारची परिस्थिती म्हणजे भयाचे वातावरण निर्माण करायचे, लोकांवर राजकीय दबाव आणायचा परंतु त्यांचे बंगाल मॉडेल फेल ठरले आहे. हे लक्षात ठेवावे असेही नवाब मलिक यांनी सुनावले आहे. महाराष्ट्रातही बंगाल मॉडेल करायची भाजपची इच्छा असेल तर करावी. भाजपच्या डावपेचाला महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही. हे लक्षात ठेवावे, असा स्पष्ट इशारा मलिक यांनी दिला आहे.   

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीसाठी चंद्रकांत पाटील यांनी अमित शहांना पत्र लिहिले आहे. यामुळे सीबीआय चौकशीचा चेंडू थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील काळात अजित पवार आणि अनिल परब यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

भाजपच्या मुंबईत झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव करण्यात आला होता. भाजपने अजित पवारांना कोंडीत पकडण्यासाठी पावले उचलण्यास सुरवात केल्याचे हे निदर्शक होते. अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने आता जाणीवपूर्वक लावून धरली आहे. 

हेही वाचा : महाविकास आघाडीत मोठी घडामोड : शिवसेना आमदारांना व्हीप जारी....

केंद्रीय तपास संस्था कशा छळ करतात, हे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना थेट लिहून कळविले आहे. अजित पवार यांच्यामागेही केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल. अजित पवारांबद्दल असलेली भाजपची सहानुभूती संपल्याचे कार्यकारिणीच्या ठरावातून स्पष्ट झाले आहे. भाजपसाठी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हेच मोठे लक्ष्य आहे. यात आता अजित पवारांचीही भर पडणार आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख