लता मंगेशकर, मुख्यमंत्री, राज ठाकरे यांचा मी आभारी आहे...शरद पवारांचे टि्वट.. - ncp leader sharad pawar health issue uddhav thackeray raj thackeray pray for his recovery | Politics Marathi News - Sarkarnama

लता मंगेशकर, मुख्यमंत्री, राज ठाकरे यांचा मी आभारी आहे...शरद पवारांचे टि्वट..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 29 मार्च 2021

पवार यांच्या तब्येतीचे वृत्त समोर आल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे काल रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यांची तपासणी केल्यानंतर बुधवारी (ता. 31) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. मलिक यांनी ट्विटवरून दिलेल्या माहितीनुसार, पोटदुखीचा त्रास होत असल्याने पवारसाहेबांना काल रात्री अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची तपासणी केल्यानंतर एन्डोस्कोपी व शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

पवार यांच्या तब्येतीचे वृत्त समोर आल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. प्रकृती बिघडल्यानंतर पवारांनी टि्वट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांचे पवार यांनी टि्वटवरून आभार मानले आहेत. डॉ. हर्ष वर्धन यांनीही फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  

"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. राज ठाकरे यांनी माझ्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आस्थेने चौकशी केली. त्यांचे मनापासून आभार" असे टि्वट पवार यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सदिच्छाबाबत पवार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार! 

लता मंगेशकर यांच्याबाबत पवार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "माझ्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी कळताच आदरणीय लता मंगेशकर दिदींनी माझ्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माझ्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. लता दिदींसारख्या सुहृदय व्यक्तींच्या सदिच्छा माझ्या सोबत आहेत. त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे."

देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट करीत पवार यांना लवकर बरे वाटावे, यासाठी प्रार्थना केली आहे. फडणवीस आपल्या टि्वट म्हणतात की श्री शरद पवार जी यांच्या प्रकृती अस्वास्थाबद्दल कळले. त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो.  

भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे, "पवार साहेब लवकर बरे व्हा ! नियोजित शस्त्रक्रिया यशस्वी होऊन आपण लवकर बरे व्हावे, हीच ईश्वराकडे प्रार्थना पक्षभेदापलीकडचे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांचे 'मार्गदर्शक' आहात तुम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील 'आधारवड' आहात तुम्ही."

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख