राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशमुखांवर सीबीआयचा छापा..जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा - NCP leader Jayant Patil slams CBI after raids on Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी देशमुखांवर सीबीआयचा छापा..जयंत पाटलांचा भाजपवर निशाणा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले होते.

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आज सीबीआयने छापेमारी सुरु केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुखांच्या जवळच्या नातेवाईकांचीही चैाकशी होणार असल्याचे समजते. 

राष्ट्रवादी कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या विषयावर टि्वट करत विरोधक भाजपचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सीबीआयच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली आहे. याबाबत जयंत पाटील यांनी टि्वट केले आहे. देशमुख यांच्या घरावरील सीबीआय कारवाईचा जयंत पाटलांनी निषेध केला आहे. 

आपल्या टि्वटमध्ये जयंत पाटील म्हणतात, ''अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला व सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण ४ जणांची चौकशी झाली, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’चे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. ''

''या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो,'' असे टि्वट जयंत पाटील यांनी केले आहे. 

 ''केवळ मानसिक त्रास देऊन बदनाम करण्याचा हा प्रकार होता. तोच प्रकार देशमुखांच्या बाबतीत होत आहे. माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली होती. त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल. अनिल देशमुख या प्रकरणातून लवकरच निर्दोष बाहेर पडतील,'' असे  राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख