राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अपघातातून बचावले - ncp leader eknath khadse car met with accident in jalgaon district | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अपघातातून बचावले

कैलास शिंदे
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मोटारीला आज अपघात झाला. या अपघातातून सुदैवाने खडसे बचावले आहेत. 

जळगाव : भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मोटारीला अपघात झाल्याची घटना आज घडली. खडसे हे अमळनेरवरून जळगावकडे येत असताना मोटारीटचे टायर फुटून हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. यात मोटारीत असलेल्या एकनाथ खडसे यांच्यासह इतर कोणालाही काही दुखापत झाली नाही. एकनाथ खडसे यांनीच ट्विट करून या अपघाताची माहिती दिली आहे. 

अमळनेर येथे विविध विकासकामांच्या उद्‌घाटन कार्यक्रमासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आज जिल्हा दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे देखील उपस्थित होते. दुपारी कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे त्यांच्या मोटारीने (एमएच 19 सीई 19) जळगावकडे परत येत होते. धरणगाव व जळगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर धरणगाव सोडल्‍यानंतर त्यांच्या मोटारीचे टायर अचानक फुटले. टायर फुटल्‍यानंतर चालकाने मोटारीवर नियंत्रण मिळवत गाडी थांबविली. 

खडसे दुसऱ्या मोटारीने रवाना
सुदैवाने अपघातात एकनाथ खडसे हे बालंबाल बचावले. अपघातानंतर अपघातग्रस्त मोटार जागेवरच उभे करुन खडसे दुसऱ्या मोटारीने जळगावकडे रवाना झाले. सदरची घटना माहिती पडल्‍यानंतर खडसे समर्थकांनी त्‍यांची विचारपूस करण्यासाठी फोनवरून संपर्क साधत होते.

या अपघाताविषयी खडसे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आज अमळनेरहून जळगावकडे येताना धरणगावनजिक माझ्या मोटारीला किरकोळ अपघात झाला. मोटारीचा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधानाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप  आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख