धनंजय मुंडे यांचा 'न्याय' राष्ट्रवादीने केला.. - NCP did justice to Dhananjay Munde Sharad Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडे यांचा 'न्याय' राष्ट्रवादीने केला..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 जानेवारी 2021

अन्य तक्रारींचीही माहिती घेणे व त्यातून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करावा, अशी आमची भूमिका असल्याचे शरद पवार म्हणाले.  

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याबाबतच्या तक्रारीची चैाकशी करण्यासाठी महिला एसीपी अधिकाऱ्यांची नेमणुक करावी, अशी आमची भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सांगितले आहे. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात तीन तक्रारी आल्या आहेत. मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप करत पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 

मुंडे यांच्या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसने काल बैठकही घेतली होती. मात्र, भाजप नेते हेगडे यांच्या आरोपानंतर या प्रकरणात मुंडे यांच्या विरोधातील आरोपाची धार काहीशी बोथट झाली आहे. मुंडे यांच्यावरील आरोपांचे स्वरूप गंभीर आहे. माझ्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ सदस्यांना याबाबत विश्वासात घेणार आहे. या सर्व वरिष्ठ सदस्यांची मते जाणून घेऊन याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ. पक्ष आणि पक्षप्रमुख म्हणून आम्ही काळजी घेऊ, असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवासापूर्वी सांगितले होते. पण त्यानंतर काल मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात आणखी तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याबाबत काल पवार यांनी आपली भूमिका मांडली. हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान आपण केले होते, त्याबाबत आता नवी माहिती प्रश्न निर्माण करणारी आहे. काही तक्रारी लक्षात घेता, यात नक्की काय घडले याचा विचार करायला हवा, असेही पवार म्हणाले. 

पहिल्यांदा जी तक्रार होती ती अत्याचार केल्याची तक्रार होती. मिडियातून बऱ्याच गोष्टी पुढे आल्या. मुंडे यांनी आम्हाला जे सांगितले होते की काही दिवसांपूर्वी ब्लॅकमेल होत असल्याची शंका होती. ते स्वतः कोर्टात गेले. त्या आॅर्डर्स आम्हाला दाखवल्या. याचा अर्थ असे काही होणार याची पूर्ण कल्पना त्यांना होती, असे पवार यावेळी म्हणाले.

ते म्हणाले, "जी व्यक्ती स्वतःहून कोर्टात जाते याचा अर्थ तिला स्वतःवर विश्वास आहे. कोर्ट काय ते ठरवेल. मी यात बोलणार नाही. आणखी एका व्यक्तीला अशाच प्रकारे त्रास देण्याचा, ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला गेला. ही बातमी एका भाजपच्या माजी आमदाराकडून आली होती. ही माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर आणखी एका व्यक्तीचे स्टेटमेंट आले. एका विमान कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार आली. आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या संबंधात तीन व्यक्तींकडून त्रास देण्याच्या तक्रारी आल्या आहेत. हे जेव्हा आम्हाला समजले तेव्हा आम्ही निष्कर्ष काढला की सखोल चौकशी झालीच पाहिजे. ती चौकशी आम्हाला खात्री आहे की पोलिस ते करतील,''

''पोलिस प्रक्रियेत आम्ही हस्तक्षेप करणार नाही. पण एक गोष्ट सुचवली की एसीपी लेव्हलची महिला अधिकारी ठेवा. अन्य तक्रारींचीही माहिती घेणे व त्यातून वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करावा, अशी आमची भूमिका आहे. काल बाकीचे चित्र माझ्याकडे नव्हते. एका भगिनीच्या तक्रारीची नोंद आम्हा सामाजिक क्षेत्रातल्या लोकांना घेतली पाहिजे. म्हणून मी हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले. मात्र, थेट कुठल्या निष्कर्षाप्रत येण्याने कुणावर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही,'' असेही पवार म्हणाले.  

''मी  म्हटले की गांभिर्याने पाहतो आहे, त्यानंतर आरोप करणाऱ्यावरच आरोप आले आहेत, त्यामुळे यातली सत्यता पडताळण्याची गरज आहे. आम्ही शहानिशा करुन घेऊन पुढची पावले टाकणार आहोत. मी भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचे स्टेटमेंट पाहिले. काळजीपूर्व चौकशी करावी, असे स्टेटमेंट त्यांनी केले होते. आता एका माजी आमदाराने स्वतःचा अनुभव सांगितल्यानंतर भाजप काय म्हणत असेल याबद्दल माझे काही म्हणणे नाही,'' असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

सरकारला टार्गेट केले जात आहे काय, यावर बोलताना पवार म्हणाले, "ज्यांच्या हातून सत्ता गेली त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. हाती येत असलेली सत्ता गेली. त्यामुळे टार्गेट करण्याचे काम आहे. यात मी वेगळे काही समजत नाही. ही राजकीय भूमिका घेण्याचा भाग आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांचे आहे. पण नेहमी गुन्ह्याच्या खोलात जाण्याची पोलिसांची जबाबदारी असते. जर नवे आरोप आले नसते तर कदाचित वेगळी चर्चा झाली असती. माझा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. ते सत्य पुढे आणतील. ज्या महिलेने आरोप केले त्यांच्याबाबत काही पुढे आल्यानंतर आता अधिक सखोल चौकशी करण्याची गरज आहे,''
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख