अनिल देशमुखांना क्लिन चीट देण्याचा राष्ट्रवादीचा अधिकृत निर्णय - ncp decides to give clean cheat to Home minister Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल देशमुखांना क्लिन चीट देण्याचा राष्ट्रवादीचा अधिकृत निर्णय

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 मार्च 2021

भाजपच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय 

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला आरोप राष्ट्रवादीने फार गंभीरतेने घेतला नसून देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपने जरी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली तरी फडणवीस यांच्याच काळात त्यांनी अनेक मंत्र्यांना क्लिन चिट दिली होती, अशी आठवण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या निमित्ताने करून दिली.

परमीबीरसिंग यांनी केलेल्या आरोपानंतर आज दिवसभर राजकीय गदारोळ सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांची अडीच तास बैठक झाली. त्या बैठकीनंतर बोलताना जयंत पाटलांनी देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली. परमबीरसिंग यांनी केलेल्या आरोपांवर ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या निःस्पृह अधिकाऱ्याची किंवा त्यांच्या सल्ल्यानुसार इतर अधिकाऱ्यांची चौकशीसाठी समिती नेमण्यात येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. परमबीरसिंग यांचे आरोप हे त्यांचे पद काढून घेतल्यानंतरचे आहेत, असाही दावा पाटील यांनी केला.

आज दिवसभरात काय घडले?

-देशमुखांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे रस्त्यावर आंदोलन

-विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढला. प्रसाद लाड, चित्रा वाघ अटक व सुटका

-सकाळी ११ वाजता नारायण राणे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली

-सकाळी ११.३० वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

-दुपारी २ वाजता शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परीषद घेऊन सरकार कोणताही धोका नसल्याच स्पष्ट केल. त्याचप्रमाणे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत येत्या २४ तासात चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

-नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन चौकशी करा अशी मागणी केली.

-सायंकाळी ७ वाजता राष्ट्रवादीच्या नेत्यांची शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक. देशमुखांचा राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख