गज्या मारणेच्या मिरवणुकीत सामील झालेले राष्ट्रवादीचे नगरसेवक, शिवसेनेच्या नेत्याला अटक - NCP corporator Sanjay Pisal and Shiv Sena leader Santosh Shelar arrested Gajya Marane | Politics Marathi News - Sarkarnama

गज्या मारणेच्या मिरवणुकीत सामील झालेले राष्ट्रवादीचे नगरसेवक, शिवसेनेच्या नेत्याला अटक

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

गज्या मारणेच्या  राजकीय कनेक्शनला दुजोरा

पिंपरी : पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गज्या मारणे याच्या मिरवणुकीत सामील झालेले सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय पिसाळ आणि महाबळेश्वर येथील शिवसेनेचा तालुका अध्यक्ष संतोष शेलार यांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामुळे गज्याचे राजकीय कनेक्शन समोर आले आहे. दरम्यान, या गुन्ह्यात फरार झाल्यानंतर त्याला शरण आणण्यातही राजकीय वरदहस्त मिळाल्याची पोलिस वर्तुळात चर्चा आहे.

खून खटल्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर १५ फेब्रुवारीला नवी मुंबई येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पडल्यानंतर गज्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात कित्येक आलिशान मोटारी व काही शेकडो जण सामील झाले होते. कोरोना निर्बंधाचे उल्लंघन करीत दहशत पसरवीत हा जल्लोष करण्यात आल्याने गज्या व त्याच्या मिरवणुकीत सामील झालेल्यांविरुद्ध तळेगाव दाभाडे येथे पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर हिंजवडी आणि पुण्यात  कोथरुड व घाटाखाली खोपोली असे दहशत निर्माण केल्याचे गुन्हे दाखल झाले होते.  

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ऊर्से टोलनाक्यावर टोल न भरता तसेच तेथे वडापाव व पाण्याच्या बाटल्यांचे पैसे न दिल्याने दरोड्याचाही गुन्हा नंतर तळेगाव दाभाडे येथे दाखल झाला. त्यात आतापर्यंत काही कोटी रुपयांच्या २३ आलिशान मोटारींसह ५९ जणांना अटक करण्यात आली. त्यातच पिसाळ आणि शेलार यांचा समावेश असल्याचे तपास करीत असलेल्या पिंपरी पोलिसांच्या गुन्हे शाखेतून सांगण्यात आले.

दरम्यान, सुटकेनंतर लगेचच नव्याने गुन्हे नोंदणीचे सत्र सुरु होताच गज्या पसार झाला होता. नंतर  त्याला सातारा पोलिसांनी पकडले. प्रत्यक्षात पोलिसांनी व त्यातही पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी कडक भूमिका घेतल्याने त्याला शरण येणे भाग पडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यासाठी पुण्यातील भाजपचा एक नेता, याच पक्षाचा सातारा जिल्ह्यातील दुसरा पुढारी आणि राष्ट्रवादीच्या एका नेत्याने महत्वाची भूमिका बजावल्याची पोलिस वर्तुळात चर्चा आहे. गज्याच्या या  राजकीय कनेक्शनला दुजोरा हा त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यात वरील दोन स्थानिक राजकीय नेत्यांच्या अटकेतून मिळाला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख