राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जिवंतपणीच चितेवर ?

जिवंतपणीच चित्तेवर झोपण्याची वेळ पुण्यातील एका नगरसेवकावर आली.
jadhav6.jpg
jadhav6.jpg

पुणे : जिवंतपणीच चित्तेवर जाण्याची वेळ पुण्यातील एका नगरसेवकावर आली. ही घटना खराडीत येथे घडली.

पुणे महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी नगरसेवक ऍड. भैय्यासाहेब जाधव सरळ स्मशानभूमीतील चितेवरच जाऊन झोपले. स्मशानभूमीतील रखडलेले काम त्वरित मार्गी लावा, या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले.

खराडी येथे मुळा-मुठा नदीच्या घाटावर स्मशान भूमीच्या पुनर्विकासाचे काम पुणे महानगरपालिकेच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. काम अंतिम टप्प्यात असले तरी अगदी किरकोळ शिल्लक काम रखडले आहे. त्यामुळे येथे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना स्मशानभूमी पर्यंत पोहोचताच येत नाही. तेथे पोचण्यासाठी रस्त्याचे कामही रखडले आहे. परिणामी अनेक अंत्यविधी स्मशानभूमी बाहेर रस्त्यावर उघड्यावर करावे लागतात. 

मध्यंतरी उघड्यावर सुरू असलेल्या अंत्यसंस्कारावेळी अचानक पाऊस आल्याने मोठा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागला होता. त्यासोबतच अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांची, वृद्धांची मोठी गैरसोय याठिकाणी होते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. नागरिकांच्या संतप्त भावना माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि स्थानिक नगरसेवकांनी अनेकदा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसमोर मांडल्या आहेत. 

पंधरा दिवसांपूर्वी माजी आमदार बापू पठारे यांनी उघड्यावरील अंत्यसंस्कार आणि नागरिकांचे होणारे हाल याचा व्हिडिओ चित्रण करून पालिका आयुक्तांना दाखवले होते. मात्र, प्रशासन ढिम्मच राहिले. याचा निषेध करण्यासाठी स्थानिक नगरसेवक भैय्यासाहेब जाधव शुक्रवारी सरळ स्मशानभूमीत पोहोचले. तेथून फेसबुक लाईव्ह करत त्यांनी चितेवर झोपून आंदोलन केले आणि पुणे महानगरपालिकेचा निषेध केला. 

जाधव म्हणाले, हे आजचे आंदोलन दुर्दैवाने करावे लागत आहे. मात्र तरीही पुणे महानगरपालिकेला जाग न आल्यास पुणे महापालिकेच्या आवारातच अंत्यविधी केला जाईल. याची दखल प्रशासनाने घ्यावी आणि येथील रखडलेले काम तातडीने मार्गी लावावे. भैय्यासाहेब जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com