फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर ते पत्र समोर! शरद पवार म्हणाले... - NCP chief sharad pawars reaction on parambir singh letter | Politics Marathi News - Sarkarnama

फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर ते पत्र समोर! शरद पवार म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 21 मार्च 2021

राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज या प्रकरणावर आज आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर ते पत्र समोर आल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

पत्रकार परिषदेपूर्वी मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले. हे प्रकरण संवेदनशील होत असल्याने चांगल्या अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांना चौकशीचे सर्वाधिकार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले. परमबीर सिंग यांच्या पत्राबाबत बोलताना पवार यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर हे पत्र समोर आल्याचे ते म्हणाले. 

सरकार स्थिर, या प्रकरणाचा परिणाम नाही

सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यात यश येणार नाही. सरकार स्थिर असून या प्रकरणाचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. पण त्या पत्रावर त्यांची सही नाही. तसेच पत्रातील आरोपाबाबत कोणतेही पुरावे नाहीत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना चौकशीचे अधिकार आहेत. त्यांनी चौकशी करून निर्णय घ्यावा. याबाबत सर्वांशी चर्चा केली जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुखांच्या गृहमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे स्पष्ट केले आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रातील परमबीर सिंग यांच्या आरोपांवर बोलताना पवार म्हणाले, परमबीर यांच्याशी माझी भेट झाली होती. त्यांनी अंबानी यांच्या घराबाहेर गाडीत सापडलेल्या स्फोटकांबाबत माहिती दिली होती. त्यांनी पत्रात उल्लेख केलेले 100 कोटी कुणाकडे गेले याचा पत्रात उल्लेख नाही. बदली झाल्यानंतरच परमबीर यांनी हे आरोप केले आहेत. आयुक्त असताना त्यांनी असे कोणतेही आरोप केले नाहीत. आरोपांबाबत कोणतेही पुरावे नाहीत. तसेच वाझेंना परत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनीच घेतला होता. हा निर्णय गृहमंत्र्यांचा नाही.

चौकशीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा. देशमुखांच्या पदाचा राजीनामा घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत पण त्याआधी आमच्याशी चर्चा होईल. देशमुख यांचे म्हणणेही ऐकून घेतले जाईल. उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काय आहे प्रकरण?

गृहमंत्र्यांनी प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा धक्कादायक आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना निधी गोळा करण्यासाठी सांगत असत. 

फेब्रुवारीच्या मध्यात गृहमंत्र्यांनी वाझेंना बोलावून घेतले होते. त्यावेळी गृहमंत्र्यांचे दोन कर्मचारीही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी वाझेंना महिन्याला 100 कोटींचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट गाठण्यासाठी त्यांनी मुंबईत 1 हजार 750 बार,  रेस्टॉरन्ट आणि इतर आस्थापना असून, प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये जमा करावेत, अशी सूचना केली होती. यातून 40 ते 50 कोटी जमा करावेत आणि उरलेले इतर मार्गांनी जमा करावेत, असे त्यांनी सांगितले, असाही आरोप परमबीरसिंग यांनी केला आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख