'रेमडेसिवीर' पुरवा, अन्यथा...साठा जप्त करु..नवाब मलिक यांचा केंद्र सरकारला इशारा - ncb leader nawab malik allegations against central government over remdesivir | Politics Marathi News - Sarkarnama

'रेमडेसिवीर' पुरवा, अन्यथा...साठा जप्त करु..नवाब मलिक यांचा केंद्र सरकारला इशारा

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 एप्रिल 2021

रेमडेसिवीर महाराष्ट्राला पुरविली नाही तर  साठा जप्त करू, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

मुंबई : ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, रेमडेसिवीर इंजेक्शन व लसींचा तुटवडा यावरुन अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली.  ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्राने महाराष्ट्राला पुरविली नाही तर आम्ही औषध साठा जप्त करू, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे. मलिक यांनी टि्वट करुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.

केंद्र सरकारने रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे देशातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकारने त्याला नकार दिला आहे, असे मलिक यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.  
 
जनतेचा जीव वाचवण्यासाठी ही जी औषधी आहेत, त्यांना विकण्याची परवानगी द्या, जर तुम्ही परवानगी  दिली  नाही तर आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. ही सगळी औषधं जी महाराष्ट्राचा जमिनीवर आहेत, निश्चितरूपाने एफडीएच्या मंत्र्याच्या माध्यमातून तो विभाग सीझ करेल व जनतेला वाटप करण्याचं काम केलं जाईल. याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही, असे मलिक यांनी केंद्र सरकारला सांगितले आहे. 

16 निर्यात कंपन्यांकडे राज्य सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनाबाबत विचारले. केंद्रसरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी आम्हाला दिली आहे, अशी धक्कादायक माहिती या कंपन्यांनी दिली असल्याचे मलिक यांनी सांगितले. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे.

देशातील सर्व स्टील प्लॅन्टची उत्पादन क्षमता कमी केली पाहिजे. तिकडचा जो ऑक्सिजनचा साठा आहे, तो या कामासाठी वापरला पाहिजे. असं देखील मलिक यांनी यावेळी सांगितलं.

राज्यात दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. मृत्यूमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, तरी देखील करोनाबाधितांची संख्या ही वाढल्याचे समोर येत आहे. काल दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले.  ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.  देशात तब्बल 2.34 लाख कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने देशातील स्थिती चिंताजनक बनली आहे. 
Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख