नाथाभाऊ पूर्वीपासून पवारसमर्थकच : रावसाहेब दानवे  - Nathabhau has always been a supporter of Pawar: Raosaheb Danve | Politics Marathi News - Sarkarnama

नाथाभाऊ पूर्वीपासून पवारसमर्थकच : रावसाहेब दानवे 

सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

एकनाथ खडसे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्ष सोडून गेल्याचे दुःख आम्हाला नक्कीच आहे.

पुणे : एकनाथ खडसे यांच्यासारखे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्ष सोडून गेल्याचे दुःख आम्हाला नक्कीच आहे. मात्र, नाथाभाऊ हे पूर्वीपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेच समर्थक म्हणून ओळखले जातात. ते पूर्वी एस कॉंग्रेसमध्ये होते, असा पुनरुच्चार केंद्रीय राज्यमंत्री रावासाहेब दानवे यांनी केला. 

भाजपचे ज्येष्ठे नेते एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे हे आज सकाळी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. 

ते म्हणाले की, नाथाभाऊ पक्ष सोडून गेल्याचे दुःख आम्हाला नक्कीच आहे. मात्र, नाथाभाऊ हे पूर्वीपासून शरद पवार समर्थकच आहेत. कारण, पूर्वी खडसे हे एस कॉंग्रेसमध्ये होते. शरद पवार यांनी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढली होती. त्यात ते सहभागी झाले होते.' 

दरम्यान, यापूर्वीही दानवे यांनी असाचा आरोप खडसे यांच्यावर केला होता. मात्र, त्या वेळी खडसे यांनी त्याचा इन्कार करत आपण कधीही कॉंग्रेसमध्ये नव्हतो, असे सांगून दानवे यांना आव्हान दिले होते. 

या वेळी दानवे यांनी "माझ्या पोटात अनेक गोष्टी आहेत,' असे सांगून पक्षातील अनेकांना गॅसवर बसवले आहे. मी मात्र, मूळच्या जनता पक्षापासून भाजपबरोबर आहे, असे नमूद केले. 

आम्हाला उत्तर महाराष्ट्राची अजिबात चिंता नाही. कारण, नाथाभाऊंनी पक्ष सोडल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची क्षमता राज्यस्तरीय आणि जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री गिरीश महाजन हे जळगावात तर, खासदार भांबरे, हिना गावीत हे धुळे, नंदूरबारमध्ये पक्षवाढीसाठी सक्षम आहेत, असा दावा दानवे यांनी केला. 

निर्णय करण्याची भारतीय जनता पक्षात एक प्रक्रिया आहे. त्यामुळे महाराष्ट्र भाजपत फडणवीस एकटे निर्णय घेत नाहीत. आमचा पक्ष कोणा एकावर अवलंबून नाही, असेही दानवे म्हणाले. 

पक्षांतर करताना आमच्या भागाचा विकास करण्यासासाठी सरकारसोबत जात आहे, असे नेत्यांना बोलावे लागते. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी मला सरकारसोबत जावे लागले, असे हे ते बरोबर बोलले आहेत. भाजपचा एकही आमदार राष्ट्रवादीत जाणार नाही, असेही रावसाहेब दानवे यांनी दावा केला. 

नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या विकासासाठी करावा 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला वाटतं असेल निवडणुकीपूर्वी भाजपने आम्हाला डॅमेज केले. त्यामुळे खडसेंसारखा नेते फोडून भाजपचे नुकसान करता येईल. नाथाभाऊंचा उपयोग विरोधी पक्षावर तोफ डागण्यापेक्षा राज्याच्या विकासासाठी करावा, असे आवाहनही दानवे यांनी या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केले. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख