Narendra Modi's dishonesty with farmers by banning onion exports: Bachchu Kadu | Sarkarnama

कांदा निर्यातबंदी करून मोदींची शेतकऱ्यांशी बेईमानी : बच्चू कडू 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

"मेक इन इंडिया'चा जयघोष केवळ उद्योजकांपुरताच मर्यादित आहे का?

नागपूर : मी नाशिकचा कांदा खाल्ला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांशी कधी बेईमानी करणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्याच जाहीर सभेत केली होती. मग आता कांद्याला दर मिळत असताना लादलेली निर्यातबंदी शेतकऱ्यांशी बेईमानी नाही का? असा सवाल प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा राज्य मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. 

कांदा निर्यात बंदीवर भूमिका मांडताना त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. बच्चू कडू म्हणाले की, पंतप्रधानांनी मेक इन इंडियाचा नारा दिला आहे. शेतकरी निर्यातक्षम दर्जेदार कांदा उत्पादन घेत असताना आणि या माध्यमातून त्यांना चांगला बाजार भाव मिळत असताना निर्यात बंदी करण्यात आली आहे. मग "मेक इन इंडिया'चा जयघोष केवळ उद्योजकांपुरताच मर्यादित आहे का? असा सवाल कडू यांनी उपस्थित केला आहे. 

कधी कधी दोनशे ते तीनशे रुपये क्विंटल दराने कांदा विकावा लागला आहे. आता अडीच ते तीन हजार रुपये क्विंटल दर पोचताच केंद्र सरकारने हस्तक्षेप करून निर्यात बंदी लादली आहे. म्हणजे भाव पडले त्यावेळी हस्तक्षेप करायचा नाही. मात्र, भाव वाढले की हस्तक्षेप करून शेतकऱ्याला मरणाच्या दारात उभे करायचे, या प्रकाराचा आम्ही निषेध करतो, असेही राज्य मंत्री कडू म्हणाले. 

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय येत्या आठ दिवसांत मागे घ्यावा; अन्यथा केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, कृषी मंत्रालयासह केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयात कांदा उत्पादकांना घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला दिला आहे. 

कांदा निर्यातबंदी तत्काळ उठवावी : महेश तपासे 

मुंबई : कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार आहे. केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे. ती तत्काळ उठवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. 

मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये (हरियाना आणि महाराष्ट्र निवडणुकांआधी) घातलेली निर्यात बंदी आता मार्चमध्ये उठवली होती. त्यानंतर बरोबर सहा महिन्यांत पुन्हा बंदी घालण्यात आली आहे. हे भाजप सरकार शेतकऱ्यांना परावलंबी ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तपासे यांनी केला आहे. 

शेतकऱ्यांनी 60 टक्के साठवलेला कांदा आधीच खराब झाला आहे आणि आता भाजप सरकारने निर्यात बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल भावाने विकण्याची वेळ येणार आहे. केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, असेही महेश तपासे म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख