नरेंद्र मोदी, अमित शहा ही म्हणायचे..."देवेंद्रजी को पूछो!'  - Narendra Modi, Amit Shah used to say ... "Ask Devendraji!" : Eknath Khadse | Politics Marathi News - Sarkarnama

नरेंद्र मोदी, अमित शहा ही म्हणायचे..."देवेंद्रजी को पूछो!' 

सरकारनामा ब्यूरो 
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

गेल्या काही वर्षांपासून माझ्याबाबत ज्या काही घटना, गोष्टी घडलेल्या आहेत ते आगामी "फडणवीसांचे बारभाई कारस्थान' या पुस्तकात असणार आहे.

मुंबई : "मंत्रिपदाचा राजीनामा घेतल्यानंतर वरिष्ठांकडे जाऊन मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन पक्षाध्यक्ष अमित शहा यांना भेटलो, त्या वेळी त्यांनी सांगितले की "देवेंद्रजी को पूछो!' त्यानंतर पक्षाध्यक्ष झालेले जे. पी. नड्डा, व्यंकय्या नायडू, प्रकाश जावडेकर यांना भेटलो, त्या त्या वेळी ते सर्वजण सांगायचे की "जब तक देवेंद्रजी आपके बारे मे यहॉं कुछ नही बोलेंगे. तब तक हम कुछ नही कर सकते. आपके बारे में यहॉं वातावरण बहुत खराब किया है.'

माझ्याविषयीचे मत वरिष्ठांकडे इतके वाईट करण्यात आले होते, की तेही म्हणायचे "आम्ही काहीही करू शकत नाही,' ते मत अजूनही कायम आहे,'' असा गौप्यस्फोट माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला. 

नाथाभाऊ खडसे हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी अनेक गोष्टी उजेडात आणल्या आहेत. मंत्रिपदाच्या राजीनाम्याविषयी त्यांनी सांगितले की "भारतीय जनता पक्षाचे देशाचे तत्कालीन संघटन सचिव व्ही. सतीश माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या. मी त्यांना विचारले की राजीनामा का द्यायचा? मी काय चोरी केली, गैरव्यवहार केला आहे का? त्यावर त्यांनी सांगितले की वरिष्ठांनी राजीनामा द्या, असा आदेश दिला आहे. त्यामुळे मी कोऱ्या कागदावर सही केली आणि राजीनामा दिला.' 

...असं बोला असे पक्षाने सांगितले होते 

खरं म्हणजे त्यावेळी मी स्वतःहून राजीनामा दिला नव्हता. पण, पक्षाने मला सांगितले होते की "मी स्वतःहून राजीनामा दिला आहे आणि स्वतःहून चौकशीची मागणी केली आहे, असे बाहेर सांगा.' त्या प्रमाणे पक्षाचे आदेश मानून मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि पत्रकारांनाही तशीच माहिती दिली. 

दुसऱ्या दिवशी राजीनामा घेतला 

अलीकडील काळात जीवनात आलेल्या कडवटपणाबद्दल खडसे म्हणाले की चाळीस वर्षांच्या राजकीय जीवनात एक आरोप माझ्यावर झाला नाही. अगदी विरोधकांनीही आरोप केलेला नाही. जेव्हा माझा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला, त्या वेळीही सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी आरोप केलेला नव्हता. तरीही माझ्यावर आरोप होताच दुसऱ्या दिवशी माझा राजीनामा घेतला गेला. 

...हा सदुपयोग की दुरुपयोग ?

"अमृता फडणवीस काम करणाऱ्या ऍक्‍सिस बॅंकेत गृह खात्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी वळविला होता. हा पदाचा सदुपयोग होता की दुरुपयोग, असा सवाल खडसे यांनी या वेळी केला. इतरांना एक न्याय आणि नाथाभाऊंना एक न्याय, असे स्वकीयांकडून का व्हावे, अशी माझ्या मनात वेदना आहे,' अशी खंतही खडसे यांनी व्यक्त केली. 

गेल्या काही वर्षांपासून माझ्याबाबत ज्या काही घटना, गोष्टी घडलेल्या आहेत ते आगामी "फडणवीसांचे बारभाई कारस्थान' या पुस्तकात असणार आहे, असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना नमूद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख