दोन माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रीमंडळात; अमित शहांनी राणेंना दिलेला शब्द पाळला... - Narayan Rane takes oath as union minister in Modi Govt | Politics Marathi News - Sarkarnama

दोन माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्रीमंडळात; अमित शहांनी राणेंना दिलेला शब्द पाळला...

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 7 जुलै 2021

राणेंचे स्वप्न अखेर साकार.... 

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात राज्याचे  माजी मुख्यमंत्री नारायण राणे मानाचे पान मिळाले असून थपथ घेणाऱ्या नव्या मंत्र्यांत राणे यांचा पहिला क्रमांक लागला.

मोदी मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्र्यांना स्थान मिळाले आहे. राणेंशिवाय आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल अशा दोन माजी मुख्यमंत्र्यांनी नव्या यादीत स्थान मिळाले आहे. राणे हे पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री झाले आहेत. गेले अनेक वर्षे ते मंत्री होणार, अशी चर्चा होती. अखेरीस ती प्रत्यक्षात आली. राणे यांनी हिंदीत आणि ईश्वराला स्मरून शपथ घेतली.

राणे यांच्या समावेशाने काही राजकीय संदेशही गेले आहेत. राणेंवर शिवसेनेचा राग आहे. त्यामुळे भाजप आता शिवसेनेसोबत जाणार की नाही, या प्रश्नाचे नकारार्थी उत्तर भाजपने दिल्याचे समजले जात आहे. राणे यांना राज्यात मंत्री करण्याचे ठरले होते. तेव्हा सेना आणि भाजप युुती होती. राणेंच्या समावेशाला शिवसेनेने विरोध केल्याने राणेंना राज्यसभेवर घेण्यात आले. त्यावेळी केंद्रात संधी देण्याचे आश्वासन भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी दिले होते. ते आता पाळले गेले. राणे, त्यांचे पुत्र नितेश आणि निलेश हे भाजपसाठी मोठे अस्त्र आहेत. विरोधकांवर त्यातही शिवसेनेवर टीका करताना राणे कुटुंब आघाडीवर असते. त्यामुळे नारायण राणे हे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर साहजिकच त्यांच्या जिभेला आणखी धार चढणार आहे. 

वाचा या बातम्या: भाजपच्या आयारामांना पायघड्या, निष्ठावंतांना नारळ

प्रीतम मुंडे यांच्या मंत्रीपदाबाबत पंकजा म्हणाल्या... 

राणे यांचा असा आहे राजकीय प्रवास!

राणे यांचा एक शाखाप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास आहे. नारायण तातू राणे यांचा जन्म 20 एप्रिल 1952 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या वरवडे गावात झाला. ते विशीत असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील चेंबूर मधून त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. 1968 मध्ये ते चेंबूरचे शाखाप्रमुख झाले. त्यानंतर 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर नगरसेवक, 'बेस्ट'चे अध्यक्ष आणि 1990 साली कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले.

महाराष्ट्रात घडलेल्या 1991 च्या राजकीय नाट्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि तेथे राणेंचा दरारा दिसून आला. शिवसेनेची दहशत म्हणून राणेंची ओळख तेव्हा निर्माण झाली. त्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये राणे 1996 ला महसूल मंत्री झाले. या सरकारच्या शेवटच्या टप्यात मनोहर जोशी यांचा राजीनामा घेऊन 1 फेब्रुवारी  1999 ते 17 ऑकटोबर 1999 या काळात राणेंना मुख्यमंत्री पदावर बसविण्यात आले.

1999 मध्ये राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले. यावेळी राणे विरोधी पक्षनेते झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी 2003 साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी नारायण राणे प्रचंड दुखावले गेले. 2004  साली त्यांनी शिवसेना सोडत काँग्रेस मध्ये प्रवेश केला. मालवण विधानसभा मतदारसंघातून ते यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून विक्रमी मताने निवडून आले. त्यांची आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्री पदी वर्णी लागली. 

2009 मध्ये आघाडी सरकारमध्ये नारायण राणे यांच्याकडे उद्योग खाते देण्यात आलं. राणेंची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती त्यामुळे ते काँग्रसमध्येही स्वस्थ नव्हते. शेवटी राणेंनी काँग्रेस सोडली आणि 2018 मध्ये स्वतःचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' काढला. याच दरम्यान नारायण राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले. नारायण राणे यांचा स्वाभिमानी पक्ष सुद्धा भाजपमध्ये विलीन झाला. ऑक्टोबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा विलिनीकरण सोहळा पार पडला. 3 एप्रिल 2018 मध्ये नारायण राणे यांची भाजपकडून राज्यसभेवर निवड झाली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर राणेंची एकहाती सत्ता आहे. राणे यांचे स्वतःचे सिंधुदुर्गात इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज आणि अत्याधुनिक हॉस्पिटल आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख