सर्वात प्रथम शपथ घेण्याचा मान राणेंना! 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली.
 Narayan Rane .jpg
Narayan Rane .jpg

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज सायंकाळी झाला. त्यात 43 जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळात महाराष्ट्रातून चौघांची वर्णी लागली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे  (Narayan Rane) यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. आजच्या शपथविधित सर्वात प्रथम शपथ घेण्याचा मान राणे यांना मिळाला. (Narayan Rane sworn in as Union Minister)     

शिवसेना, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष असा प्रवास करून भाजपत स्थिरावलेले माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. नारायण राणे यांचा एक शाखाप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा मोठा राजकीय प्रवास आहे. 

नारायण तातू राणे यांचा जन्म 20 एप्रिल 1952मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या वरवडे गावात झाला. राणे विशीत असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील चेंबूर मधून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली. 1968 मध्ये ते शिवसेनेच्या चेंबूर शाखेचे प्रमुख झाले. 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. नंतर नगरसेवक, 'बेस्ट'चे अध्यक्ष आणि 1990 मध्ये कणकवली-मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. 

महाराष्ट्रात घडलेल्या 1991 च्या राजकीय नाट्यानंतर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि विरोधीपक्ष नेतेपदाची संधी राणेंकडे चालून आली. त्यानंतर शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये राणे 1996 मध्ये महसूल मंत्री झाले. या सरकारच्या शेवटच्या टप्यात मनोहर जोशी यांचा राजीनाम्या नंतर 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑकटोबर 1999 या काळात राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

1999 मध्ये राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडी सरकार आले. यावेळी नारायण राणे विरोधी पक्षनेते झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी 2003 मध्ये महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी राणे प्रचंड दुखावले गेले. 2004 मध्ये त्यांनी शिवसेनाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मालवण विधानसभा मतदारसंघातून राणे यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून विक्रमी मताने निवडून आले. त्यांना आघाडी सरकारमध्ये महसूलमंत्री पदाची संधी मिळाली. 

2009 मध्ये आघाडी सरकारमध्ये राणे यांच्याकडे उद्योग खाते देण्यात आले. नारायण राणे यांनी महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्रिपदाची होती त्यामुळे ते काँग्रसमध्येही स्वस्थ नव्हते. राणेंनी काँग्रेस सोडली आणि 2018 मध्ये स्वतःचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' काढला. याच दरम्यान राणे भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेले. राणे यांचा स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन झाला. ऑक्टोबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विलिनीकरण सोहळा पार पडला. 

3 एप्रिल 2018 मध्ये राणे यांची भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर निवड झाली. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर राणेंची एकहाती सत्ता आहे. राणे यांचे सिंधुदुर्गात इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज व अत्याधुनिक हॉस्पिटल आहे.

Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com