विधानसभा अध्यक्षपदावर राष्ट्रवादी, शिवसेनेचा डोळा... - Narayan Rane criticizes NCP and Shiv Sena for the post of Assembly Speaker | Politics Marathi News - Sarkarnama

विधानसभा अध्यक्षपदावर राष्ट्रवादी, शिवसेनेचा डोळा...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

'ही आघाडी नसून बिघाडी आहे,' असा टोला नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला.

मुंबई :  "विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर आता या पदासाठी महाविकास आघाडीत स्पर्धा सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पदासाठी टपून बसले आहेत," अशी टीका भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. 'ही आघाडी नसून बिघाडी आहे,' असा टोला राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला.

केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे नेते अमित शाह हे आज कोकण दैाऱ्यावर येत आहे. सिंधुंदूर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे त्यांच्या हस्ते उद्धघाटन होत आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. राणे म्हणाले की महाविकास आघाडी सरकार लवकरच जाईल, कारण या सरकारला जनता कंटाळली आहे. हे सरकार जावं, असं जनतेला वाटतं. महाविकास आघाडी सरकारने राज्यात कुठलाही विकास केला नाही. 
राज्यातील शेतकऱ्याचे कर्ज माफ न करता, त्यांचा सातबारा कोरा न करता दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आघाडी सरकारमधील मंडळी पाठिंबा देत आहेत. राज्याला अधोगतीकडे घेऊन जाणारे हे सरकार आहे.

"राज्यातील आघाडीची बिघाडी करण्यासाठी आमची तयारी नेहमीच असते. सत्तेसाठी शिवसेनेने आपलं हिंदुत्व गुंडाळून ठेवलं आहे," असे राणे यांनी यावेळी सांगितले. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारात अमित शाह हे सिंधुदूर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घघाटनाला येत आहेत. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्या प्रदेशात जातात, तो प्रदेश शतप्रतिशत भाजपमय होतो. राज्यातही त्यांच्या दौऱ्यामुळे सत्तांतराचे शुभ संकेत आहेत. लवकरच राज्यात भाजपचा मुख्यमंत्री पहायला मिळेल, असा दावा भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी शनिवारी कणकवली येथे केले. 

श्रेयवादापोटी राज्यातील मंत्रीच एकमेकांच्या मतदारसंघातील विकामांना खो देत असल्याचे राज्यातील विकास प्रक्रिया ठप्प झाली आहे. शिवसेनेचे सर्व आमदारदेखील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मंत्र्यांच्या कारभाराला कंटाळले आहेत, असेही ते म्हणाले. कणकवली येथील भाजप कार्यालयात जठार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली. त्यांच्यासोबत भाजपचे चंद्रहास सावंत, प्रसाद जाधव आदी उपस्थित होते. 

जठार म्हणाले, "राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही. तीनही पक्षातील मंत्री एकमेकांच्या मतदारसंघातील विकासकामे अडवून ठेवत आहेत. आडाळी येथे वनस्पती संशोधन प्रकल्प मंजूर झाला. पण, त्याचे श्रेय शिवसेनेला मिळेल म्हणून कॉंग्रेसचे अमित देशमुख यांनी या प्रकल्पाला खो घातला आहे. नाणार येथे रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाची मंडळी आग्रही आहेत. मात्र, नाक कापले जाईल या भीतीने शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध सुरू ठेवला आहे. 

 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख