सरपंच सांगा कुणाचे ?.. चक्क 42 लाखांची बोली.. - Nandhubar District 42 lakh for Sarpanch Post Gram Panchayat election | Politics Marathi News - Sarkarnama

सरपंच सांगा कुणाचे ?.. चक्क 42 लाखांची बोली..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

गावातील शिवाजी चौकात झालेल्या सभेत सर्वच पक्षांकडून सरपंच पदासाठी बोली लावण्यात आल्याची चर्चा आहे.

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील खंडामोळी गावात विकासाच्या नावाखाली वाघेश्वरी माता मंदिर उभारणीसाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चक्क सरपंचपदासाठी 42 लाखांची बोली लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुकाध्यक्षांनी मारलेल्या या बाजीचा गावातील इतर समाजाकडून विरोध होत आहे.  

साधारणतः पाच हजार लोकसंख्या असलेल्या खोंडामोळी ग्रामपंचायतीत आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विकासाच्या नावाखाली गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीसाठी ज्या पक्षाकडून जास्त निधी दिला जाईल त्यांना ग्रामपंचायत बिनविरोध करून सरपंचपद देण्यात येईल. यासाठी गावातील शिवाजी चौकात झालेल्या सभेत सर्वच पक्षांकडून सरपंच पदासाठी बोली लावण्यात आल्याची चर्चा आहे.

25  लाखांपासून तर 42 लाखांपर्यंत झालेल्या या बोलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप वना पाटील यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीसाठी होणारा खर्च टाळून गावाचा विकास व्हावा, यासाठी झालेला प्रयत्न योग्य आहे, परंतु सरपंच पदासाठी झालेला लिलाव लोकशाहीसाठी घातक असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित मोरे यांनी व्यक्त केली आहे.

खोंडामळी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 72 वर्षात बिनविरोध निवडणूक झालेली नाही. गावातील वाघेश्वरी माता मंदिर उभारणीसाठी भाविकांनी अनेक वेळा प्रयत्न केले परंतु निधीअभावी मंदिराची स्थापना झाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत मंदिर उभारणीसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी चक्क सरपंच पदाचा लिलाव केला आहे. यासाठी गावातील वाघेश्वरी माता श्रद्धाळूनीं मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. 

खोंडामळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाचा पैशांच्या जोरावर झालेला लिलाव लोकशाहीसाठी घातक असून अशा प्रकारचा निर्णय संविधानाच्या विरोधात आहे. गावातील सर्व नागरिकांना विश्वासात न घेता ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाचा झालेला लिलाव आम्हाला मान्य नाही. गेल्या अनेक वर्षापासून समाजमंदिर, पाण्याची टाकी, रस्ते या सुविधांपासून आम्ही वंचित आहोत, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे अनुसूचित जमातीतील आंबेडकरवादी संघटनांनी निर्णय घेतला आहे.

खोंडामळी ग्रामपंचायत मध्ये गावाचा विकास व वाघेश्वरी माता उभारणीसाठी सरपंच पदाचा केलेला लिलाव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे अनुसूचित जमातीतील नागरिकांना हा निर्णय मान्य नसून निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळे खोंडामळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होते की नाही हे तर येणारी वेळच सांगू शकेल परंतु सध्यातरी सरपंचपदासाठी 42 लाखाची लागलेली बोली चर्चेचा विषय ठरत आहे.
(Edited  by : Mangesh Mahale) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख