केवळ गांधी द्वेषातूनच 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्काराच्या नावात बदल! 

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की ''हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे आहे.
 Nana Patole, Modi government  .jpg
Nana Patole, Modi government .jpg

मुंबई : ''केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नेहरु-गांधी नावाचा प्रचंड तिरस्कार आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार करत आहे. देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्काराचे नाव बदलण्याची कृतीसुद्धा त्याच गांधी नावाच्या द्वेषातूनच आलेली आहे. मोदी सरकारच्या या कोत्या मनोवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे'', असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  (Nana Patole) यांनी म्हटले आहे. (Nana Patole criticizes Modi government) 

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की ''हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या सन्मानार्थ दुसरा पुरस्कार देता आला असता किंवा त्यांच्या नावाने क्रीडा क्षेत्रासाठी मोठी योजना राबवता आली असती. त्यातून मेजर ध्यानचंद यांचा सन्मानच झाला असता. त्यांच्या नावाला विरोध असण्याचे कारण नाही. त्यांचे नाव दिल्याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, केवळ गांधी द्वेषातून नाव बदलणे हे हीन पातळीच्या राजकारणाचे दर्शन घडवते, असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे. 

स्व. राजीव गांधी यांनी आधुनिक भारतासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने विविध क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा या पुरस्काराच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जात असे. राजीव गांधी यांचे देशाच्या विकासातील योगदान व करोडो लोकांच्या मनातील स्थान मोठे असून अशा पद्धतीने ते स्थान तसूभरही कमी होणार नाही, असेही पटोले म्हणाले. 

राजीव गांधी यांच्या नावालाच विरोध असेल तर मग नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान तरी काय? अहमदाबादमधील मोटेरा क्रिकेट स्टेडियमलासुद्धा एखाद्या महान क्रिकेटपटूचे नाव देता आले असते. मात्र, त्या स्टेडियमचे सरदार वल्लभभाई पटेल हे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले. त्यामुळे राजीव गांधी यांचे नाव बदलल्याने आश्चर्य वाटत नाही, ही कृत्ती भाजप व संघाच्या द्वेषमुलक वृत्तीतून आलेली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी असलेली आर्थिक तरतूद कमी करायची आणि दुसरीकडे आपले सरकार क्रीडा क्षेत्र व खेळाडूंचे किती हित जपते हे दाखवण्यासाठी असे केविलवाणे काम करायचे. यातून क्रीडा क्षेत्राचा अथवा खेळाडूंचा कोणताच फायदा होणार नाही, असेही पटोले म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com