'माझा पोरगा अधिकारी होणार..' भंगारवाले बाबांचा शब्द खरा ठरला...

भंगार विकले, रद्दी विकली. ते गोळा करण्यासाठी सायकल वर उन्हातान्हाच पळालो. आपल्या नशिबी गरिबी आली कमीत कमी याच्या तरी नको. पोरानेही माझा विश्वास कधी तोडला नाही.
अक्षय गडलिंग
अक्षय गडलिंग

पुणे : अमरावती तालक्याच्या तिवसा येथील एका अक्षय गडलिंग याने आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं चीज केल आहे. नुकत्याच राज्यसेवा परीक्षेच्या निकालात नायब तहसीलदार हे पद मिळवले आहे. वडील बाबूराव गडलिंग यांचा ' माझा पोरगा अधिकारी होणार' हा शब्द खरा ठरला आहे. 

अक्षयचे वडील बाबुराव यांनी 'सरकारनामा'शी बोलताना अनेक कटू आठवणींनी उजाळा दिला. मला अनेक लोक विचारायचे तुझा पोरगा काय करतोय? मग मीही त्यांना आत्मविश्वासाने सांगायचो माझा पोरगा अधिकारी होणार. काहींना खर वाटायचं.. काहींना खोट वाटायचं.. मग ते हसून जायचे.. आयुष्यात अनेक प्रसंग वाईट आले. किती गोष्टी सांगू तुम्हाला. भंगार विकले, रद्दी विकली. ते गोळा करण्यासाठी सायकल वर उन्हातान्हाच पळालो.

आपल्या नशिबी गरिबी आली कमीत कमी याच्या तरी नको. पोरानेही माझा विश्वास कधी तोडला नाही. तोही कष्ट घेत होता. एकदोन वेळा या क्षेत्रात अपयश आलं. पण मी त्याला खचू दिल नाही. आमचं काय होयच ते होऊदे. तू मात्र मागे हटायाच नाही. अपयश येत असत आणि जात असत. असं मी त्याला समजावत असे. त्याने मग पुढे नेटाने अभ्यास केला आणि नायबतहसीलदार म्हणून निवड झाली. आयुष्य जिंकल बघा सगळं. धन्य झालो आम्ही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. 

तिवस्यातील अक्षयचा जिद्दीची अन् यशाची कथा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. घरात अठरा विश्व दारिद्र असतानाही, अक्षयने परिस्थितीवर मात करत नायब तहसिलदार पदाला गवसणी घातली. अक्षयच्या या यशस्वीतेमुळे जिल्ह्यात त्याचे आणि त्याच्या आई-वडिलांचे कौतुक होत आहे. 

अक्षय गडलिंग हा तिवसा शहरात राहतो. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्याने भविष्यात त्याने मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी त्याने प्रयत्नांची परिकाष्ठा केली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अक्षय महागडे शिकवणी वर्ग लावू शकत नव्हता. त्यामुळे त्याने विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शिकवणी वर्गात प्रवेश घेतला. त्याने दिल्ली येथील शिकवणी वर्गात तसेच तिवस्यातील राजश्री शाहू महाराज वाचनालयात तासनतास बसून अभ्यासाचे धडे गिरवले. गेल्यावेळी तहसीलदार पदासाठी तीन गुणांनी नापास झालेला अक्षय खचून न जाता पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागला आणि त्याने यश मिळविले.

अक्षय त्याला मिळालेल्या या यशाचे सर्व श्रेय आईवडिलांना, मित्रांना आणि शिक्षकांना देतो. अक्षयचे 'माझे बाबा हे ९ वी वर्ग पास तर आई ४ थी शिकलेली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने वडील भंगार, रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय करताना तर आई मोलमजुरी करते, असे असूनही त्यांनी गरिबीची झळ मला कधीच पोहचू दिली नाही. त्यामुळे, माझे हे यश माझ्यापेक्षा माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचं पांग फेडणारं आहे.

मी सरकारच्या सर्व योजनांचा फायदा माझ्या अभ्यासासाठी घेतल्याचेही अक्षयने सांगितले. आई-वडिलांनी दिलेलं पाठबळ, मित्र व शिक्षकांची साथ आणि सरकारी योजनांचा फायदा घेऊन मी स्वत:ला अभ्यासात झोकून दिलं. उपजिल्हाधिरी आणि तहसिलदार पदाची पोस्ट अतिशय कमी मार्काने मी हुकलो. पण, नायब तहसिलदार हेही नसे थोडके असे म्हणत आई - वडिलांनी मला समजावून सांगत धीर दिला, असेही अक्षय म्हणाला.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com