Municipal officials will be responsible for the rising corona. | Sarkarnama

भाजप आमदारांकडून मनपा आयुक्तांना तंबी...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 जुलै 2020

अन्यथा वाढत्या संसर्गाला महापालिका अधिकारीच जबाबदार असतील, अशीं तंबी लेखी पत्राव्दारे भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी महापालिका आयुक्त सतीश कुळकर्णी यांना दिली आहे.

जळगाव : जळगाव शहर महापालिका हद्दीत कोरोना रूग्णांची तसेच मृत्यू होणाऱ्या रूग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आवश्‍यक त्या उपाययोजना करीत नाही. आयुक्तांनी ताबडतोब लक्ष देवून उपाय सुरू करावे, अन्यथा वाढत्या संसर्गाला महापालिका अधिकारीच जबाबदार असतील, अशीं तंबी लेखी पत्राव्दारे भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी महापालिका आयुक्त सतीश कुळकर्णी यांना दिली आहे.

जळगाव शहरात "कोरोना'चा संसर्ग वाढतो आहे. जळगाव शहरात 894 रूग्ण आहेत. यापैकी तब्बल 169 पॉझिटीव्ह आहेत. तर शहरात तब्बल 11 जण मृत्यू पावले आहेत. जळगाव शहरातील स्थिती अत्यंत गंभीर आहे. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांच्या खाटा फुल झाल्या आहेत. तर क्वारंटाईन केंद्रांतही रूग्णांची संख्या फुल्ल झाली आहे.

शहरातील अनेक भाग "हॉटस्पॉट' झोन झाले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अशा स्थितीत महापालिकेकडून तातडीने आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र, त्या उपाययोजना केल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत. जळगाव महापालिकेतर्फे संसर्ग रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप आता थेट भाजप आमदार सुरेश भोळे यांनीच केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेवर भाजपचीच सत्ता आहे. तरीही त्यांनी प्रशासनावर आरोप केल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

आमदार सुरेश भोळे यांनी याबाबत "सरकारनामा'शी बोलतांना सांगितले, जळगाव शहरातील "कोरोना'चा वाढता संसर्गाबाबत आपण आयुक्तांना तीन पत्रे दिले आहेत. त्यात त्यांना शहरात वैद्यकीय टीमच्या मार्फत प्रत्येक घरोघरी जाऊन रूग्णांची तपासणी करण्याबाबत सुचविले आहे. प्रभाग अधिकाऱ्यांना त्या-त्या भागाची तपासणीची जबाबदारी देवून त्यांच्याकहून त्या भागातील तपासणी करून त्याचा अहवाल दररोज मागवावा असेही आपण सूचविले आहे. त्यावर त्यांनी आपण चाचणी सुरू करीत आहोत असे सांगितले. 

परंतु अद्यापही ती सुरू केलेली नाही. तसेच शहरात वाढती गर्दी लक्षात घेवून बाजार पेठेतही उपाययोजना करण्याबाबत सुचविले आहे. तर सद्यस्थितीत जिल्हा रूग्णालयात रूग्णांसाठी आता खाटा फुल्ल झाल्या आहेत. तसेच क्वारंटाईन सेंटरमध्येही आता जागा नाही. त्यामुळे सामाजिक संस्थाचे सहकार्य घेवून काही मंगल कार्यालय, हॅास्टेल तसेच हॉल या ठिकाणी सुविधा करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे, अशी मागणीही केली आहे. मात्र आयुक्तांनी अद्यापपर्यंत सामाजिक संस्थाची बैठकही बोलावलेली नाही. महापालिका आयुक्त हे उपाययोजना बाबत दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे भविष्यात जर कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला तर त्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची असेल, असेही आपण त्यांना सूचविले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख