ए उद्धव!.. कहाॅं छुपाॅं है तू, विचारणाऱ्या अर्णबला मुंबई पोलिसांनी `टीआरपी`त घेरले! - mumbai police busts trp racket showing finger towards Arnab Goswami | Politics Marathi News - Sarkarnama

ए उद्धव!.. कहाॅं छुपाॅं है तू, विचारणाऱ्या अर्णबला मुंबई पोलिसांनी `टीआरपी`त घेरले!

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

खोटा टीआरपी दाखवून सुमारे 40 हजार कोटी रुपयांच्या जाहिरातींचा घोटाळा झाल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. 

मुंबई : पालघर येथील साधूंचे हत्याकांड, सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, रिया चक्रवर्तीविरोधातील कारवाई अशा अनेक मुद्यांवरून उद्धव ठाकरे सरकारला धारेवर धरणाऱ्या रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णब गोस्वामी आता नव्या अडचणीत सापडला आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी वाहिन्या खोट्या टीआरपीसाठी कशा क्लुप्त्या वापरत होत्य, याचे रॅकेट उध्वस्त केल्याची माहिती आज दिली. या प्रकारात इतर काही टिव्ही चॅनेलसह रिपब्लिकचाही समावेश आहे.

वृत्तवाहिन्यांना BARC कडून रेटिंग मिळत असते. त्यानुसार त्यांना जाहिराती मिळतात. BARC ने हंसा एजन्सीला रेटिंगच्या तपासासाठी नेमले होते. हंसा एजन्सीने एक सर्व्हे केला. त्यात काही लोक गरिब कुटुंबाना पैसे देऊन काही वृत्तवाहिन्या दिवसभरासाठी सुरु ठेवण्यास सांगत असल्याचे आढळले. त्याबदल्यात त्यांना पैसे दिले जायचे. अशाप्रकारे ३० हजार पॉईंट्सचा घोटाळा झाला असून त्यापैकी दोन हजार पॉईंट्स मुंबईतून मिळाले आहेत. या प्रकरणी `फक्त मराठी` आणि `बॉक्स सिनेमा` यांच्या मालकांना अटक करण्यात आले आहे. तसेच रिपब्लिक टीव्हीसाठी हा घोटाळा करण्यात आल्याचेही आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.

महाआघाडी सरकार आणि रिपब्लिक टिव्ही यांच्यातील सामना आता वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी बोलणाऱ्या अर्णबबद्दल आघाडीतील नेते आधीच चिडून होते. ए उद्धव, ए संजय राऊत कहाॅं छुपा है तू, अशी बडबड अर्णब करत होता. आता टीआरपीती अर्णबला घेरण्याची संधी मुंबई पोलिसांना पर्यायाने आघाडी सरकारला मिळाली आहे. अर्णब गोस्वामी विरोधात विधीमंडळात हक्कभंगाचाही ठराव करण्यात आला असून त्याची नोटीसही बजावण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या माहितीप्रमाणे BARC नावाची कंपनी TRP म्हणजेच टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट मोजण्याचं काम करते. BARC या कंपनीने काही शंका आल्याने मुंबई पोलिसांकडे TRP स्कॅम बाबत मुंबई पोलिसांकडे तक्रार केलेली. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी तपासाला सुरवात केली. TRP म्हणजेच टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट मोजण्यासाठी काही घरांमध्ये विशिष्ठ मशिन्स बसवण्यात येतात. ज्या घरांमध्ये TRP मोजण्याची मशिन्स बसवण्यात आलेल्या आहेत त्यांना पैसे देऊन काही विशिष्ठ चॅनल्स लावण्यास सांगितलं जायचं. यामध्ये हंसा कंपनीचं नाव प्रामुख्याने पुढे येतेय. हंसा कंपनीकडे या मशिन्सच्या मेंटेनंस म्हणजेच डागडुजीचं कंत्राट होत. त्यामुळे स्वाभाविक त्यांच्याकडे कुणाच्या घरात मशिन्स आहेत यांची माहिती होती. या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवलं जात असल्याचंही पोलिसांनी सांगितलं. तर हंसा कंपनीच्या काही आजी कर्मचाऱ्यांवर देखील पोलिसांना संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका घरात एका महिन्याला साधारण चारशे ते पाचशे रुपये दिले जायचे आणि त्यांना विशिष्ट चॅनल सुरु ठेवण्यास सांगितलं जायचं. मुंबई पोलिसांना अशीही काही घरं सापडली आहेत ज्या घरांमध्ये हे मशिन्स लावले गेलेत आणि त्या घरांमधील लोकं अशिक्षित आहेत. मात्र तरीही त्यांच्या घरी इंग्रजी चॅनल्स पहिली गेलीत.

आयुक्त परमबीर सिंग म्हणाले की, हंसा एजन्सीच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी या घोटाळ्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली होती. रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीला मागच्या काही दिवसांत अचानक मोठा TRP मिळायला सुरुवात झाली होती. याची दखल BARC (Broadcast Audience Research Council) कडून घेण्यात आली आणि हंसा एजन्सीला याचा तपास करण्याचे सांगितले होते, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांच्या मालकांवर कलम ४०९, ४२० अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच ज्या रिपब्लिक वाहिनीसाठी हा घोटाळा करण्यात आला त्या वाहिनीची देखील चौकशी होणार आहे. रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या बँक अकाऊंट्सला तपासले जाईल, जाहीरातदारांकडून आलेल्या पैशांची चौकशी होणार त्यात काही बेकायदेशीर आढळल्यास जप्ती करण्यात येईल, अशी माहिती परमबीर सिंग यांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख