सुशांतसिंह प्रकरण : मुंबईत येणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांना महापालिका असे थोपविणार... - Mumbai Municipal Corporation will stop CBI officers by this way | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह प्रकरण : मुंबईत येणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांना महापालिका असे थोपविणार...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केंद्राने सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीतून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक मुंबईत येण्याची शक्‍यता आहे.

मुंबई : मुंबईत शासकीय कामासाठी परराज्यांतून येणाऱ्या अधिकाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय क्वांरटाईनच्या नियमातून सूट मिळणार नाही, असे महापालिकेने आज स्पष्ट केले. नियमानुसार परराज्यांतून येणाऱ्या विमान प्रवाशांना मुंबईत 14 दिवस होम क्वांरटाईन बंधनकारक आहे. यातून सूट मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी मुंबईत येण्यापूर्वी किमान दोन दिवस आधी महापालिकेकडे ई-मेलवरून अर्ज करावा, अशी सूचना पालिकेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून आज जाहीर करण्यात आली.

मात्र, या निर्णयामुळे आता वाद पेटण्याची शक्‍यता आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास केंद्राने सीबीआयकडे सोपवला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीतून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक मुंबईत येण्याची शक्‍यता आहे. मात्र, या पथकालाही आता अर्ज करूनच क्वारंटाईनमधून सूट मिळवावी लागणार आहे. त्यामुळे बिहार पोलिस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याचा वाद शमला नसतानाच त्यात आणखी भर पडली आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांचे पथक मुंबईत आले होते. पथकाने मुंबईत काही जणांच्या जबान्याही घेतल्या. त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी पटणा येथील पोलिस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत दाखल झाले. ते गोरेगाव येथील राज्य राखीव दलाच्या विश्रामगृहात पोहचल्यानंतर पालिकेच्या पथकाने त्यांना होम क्वारंटाईन राहाण्याची शिफारस करून त्यांच्या हातावर शिक्काही मारला. यानंतर बिहार पोलिसांनी पालिकेकडे अर्ज करून तिवारी यांना सूट देण्याची विनंती केली होती. मात्र, पालिकेने यास नकार दिला होता.

या प्रकरणानंतर पालिका प्रशासनाने 3 ऑगस्ट रोजी विमानतळावर तैनात असलेल्या वैद्यकीय पथकाला पत्र पाठवले. विमानाने परराज्यांतून मुंबईत येणारे काही अधिकारी पालिकेच्या पथकाला सरकारी ओळखपत्र दाखवून होम क्वारंटाईनपासून सूट मिळवत आहेत. मात्र, विमानतळावरील वैद्यकीय पथकाने परस्पर सूट देऊ नये, असे स्पष्ट निर्देश या पत्रात अतिरिक्त आयुक्त पी वेलारसू यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले आहेत.

बिहारचे पथक पुन्हा येण्याची शक्‍यता

महापालिकेने विमानतळावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेले हे पत्र आज ट्विटरद्वारे जाहीर केले. कोव्हिड साथीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र व राज्य सरकारची नियमावली, तसेच 25 मे रोजीचे राज्य सरकारचे निर्णय, यानुसार ही कार्यवाही करण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी करणार आहे. त्यामुळे केंद्रीय पथक, तसेच बिहार पोलिसांचेही पथक पुन्हा मुंबईत येण्याची शक्‍यता आहे.

वाचा या बातम्या

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख