विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे नाव.... - Mumbai Congress secretary Dhananjay Junnarkar has demanded that actress Renuka Shahane be sent to the Legislative Council.   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे नाव....

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

अभिनेत्री रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी टि्वटकरून केली आहे. 

मुंबई : विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रांशी संबंधित १२ व्यक्तींची  वर्णी लागणार आहे. यासाठी अनेक जणांची नावे सध्या चर्चेत आहेत.  शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेते शरद पोंक्षे यांच्या नावांची चर्चा आहे, तर काँग्रेसने अभिनेत्री रेणुका शहाणे यांचे नाव पुढे केले आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी टि्वटकरून केली आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून प्रत्येकी ४ नावांची शिफारस राज्यपालांकडे करायची आहे. सोमवारी ही यादी राज्यपालांकडे पाठवली जाण्याची शक्यता आहे. त्याआधी महाविकास आघाडीतील घटक पक्ष प्रत्येक नावावर सखोलपणे विचार करताना दिसत आहे.  

उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी उत्तर मुंबईतून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. गेल्या काही दिवसांपासून मातोंडकर सामाजिक विषयांवर खूप आक्रमक भूमीका मांडत आहेत. महाराष्ट्र, मुंबई यावरही त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत घेण्याचा विचार केला जाऊ शकतो. तर शिवसेनेकडून सावरकरप्रेमी अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे.

रेणुका शहाणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून थेट टीका केली होती.  "जिथे मोठमोठे नेते प्रतिक्रिया द्यायला घाबरतात तिथे रेणुका शहाणे निर्भीडपणे व्यक्त होतात. अशा व्यक्तीला विधान परिषदेवर पाठवून न्याय द्यावा," अशी विनंती जुन्नरकर यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, एच. के. पाटील व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना टॅग करत जुन्नरकर यांनी ही मागणी केली आहे. 

उर्मिला मातोंडकरांनी शिवसेनेला होकार कळविला ! 
"आपण आमदार होण्यास तयार आहोत.. " असा होकार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेला कळविला असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी काल दिली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मातोंडकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूकही लढविली होती. त्यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर त्या पक्षात सक्रिय राहिल्या नाहीत. त्या राजकारणापासून दूर राहिल्या. सुशांतसिंह प्रकरणानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या. अभिनेत्री कंगना राणावत हिने बॉलिवूड आणि मुंबईविषयी जी काही मुक्ताफळे उधळली होती त्याला मातोंडकर यांनी जशास तसे उत्तर देऊन आपला मराठीबाणा दाखविला होता. राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या रिक्त जागांपैकी एका जागेवर मातोंडकर यांच्या नावाची शिवसेनेकडून शिफारस करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोंडकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती.  संजय राऊत यांनी मातोंडकर यांनी आमदार होण्यास होकार दिल्याची माहिती दिली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख