राज्यकर्त्यांची पदावर राहण्याची लायकी नाही : उदयनराजे   - MP Udayan Raje Bhosale strongly criticizes the state government | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यकर्त्यांची पदावर राहण्याची लायकी नाही : उदयनराजे  

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोक मरायला लागली आहेत. काही जण डोक्याने फक्त पैशाचा विचार करतात मी फक्त भावनेचा विचार करतो.

सातारा : विजयादशमीनिमित्त खासदार उदयनराजे यांनी जलमंदीर पॅलेस येथे भवानी तलवारीचे साध्या पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी परंपरागत सुरु असलेली शाही मिरवणुक कोरोनामुळे या वर्षी रद्द करण्यात आली होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी राजघराण्याच्या वतीने सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन जगभरात कोरोनाचे सावट पसरले असल्याचे सांगुन यामुळे रूढी, परंपरा सण यावर्षी साजरे करता आले नसल्याची खंत व्यक्त केली.

या सणाच्यानिमित्ताने जो लोकांमधील जिव्हाळा आहे, तो कोरोनाने हिरावून घेतला आहे, असे ते म्हणाले. उदयनराजे यांनी आई भवानी चरणी प्रार्थना करीत हे कुठेतरी थांबले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.

खासदार उदयनराजे म्हणाले की देशातील सर्व खासदार आणि आमदारांचे 2 वर्षातील संपूर्ण खासदार, आमदार निधी वर्ग करून घेतल्याने लोक आम्हाला जाब विचारात आहेत. महाराष्ट्र पुरता न बोलता केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे हे पैसे नेमके गेले कुठे ? कोरोना काळात प्रत्येकाला बेड, व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे, मग एवढे निधीचे पैसे गेले कुठे याचे उत्तर केंद्र आणि राज्य सरकारने देणे गरजेचे आहे.

राज्यकर्त्यांना थोडी लाज असेल तर याचे उत्तर दिले. पाहिजे. लोक दवाखाण्याचा खर्च भागवण्यासाठी कुठून पैसे आणणार ? दारिद्ररेषेखाली राहणाऱ्या लोकांनी आलेल्या लाखोंच्या खर्चाबाबत काय करायचे ? प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लोक मरायला लागली आहेत. काही जण डोक्याने फक्त पैशाचा विचार करतात मी फक्त भावनेचा विचार करतो. असले हिम्मत तर समोर येऊन बोला.  

राज्य सरकारच्या कारभारावर उदयनराजे यांनी यावेळी जोरदार टीका केली. कोरोनाच्या वाढत्या भरमसाठ बिलाबाबत उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली. भवानी मातेला साकडे घालत उदयनराजे भोसले यांनी राज्य कर्त्यांना बुद्धी दे अशी प्रार्थना केली. ज्या लोकांनी राज्य कर्त्यांना निवडून दिले त्यांची काळजी घेणे हे राज्यकर्त्यांचे काम आहे. लोकांच्या विश्वासाला पात्र नसलेल्या राज्यकर्त्यांची पदावर राहण्याची लायकी नसल्याचे उदयनराजे यांनी यावेळी सांगितले

उदयनराजे म्हणाले, "कोरोनाबाबतचे निर्णय जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिले असल्याने आणि प्रशासन लोकप्रतिनिधींचा अभिप्राय घेत नसल्यामुळे ही संपूर्ण यंत्रणा जनसामान्यांना विचारात घेऊन केली जात नाही. हा सर्व पैशासाठी खटाटोप चालला आहे." कोरोनाबाबत प्रांत, तहसीलदार, कलेक्टर यांच्या महसूल विभागाचा मेडिकल विभागाशी काय संबंध ? याबाबत डॉक्टर, फिजिशन यांना मिळणाऱ्या वेतनात वाढ केली पाहिजे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.  

कोरोनाची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. श्रीमंत, गरीब कसे ठरवणार..पैश्यांची श्रीमंती मी मानत नाही. हे असेच चालत राहिले तर सामान्य जनता पुढाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत. मला प्रश्न विचारायचे नाही..मला वेदना होतात. म्हणून हे सर्व बोलतो, असे त्यांनी सांगितले.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख