खासदार रक्षा खडसे जळगावातील भाजपच्या बैठकीला गैरहजर  - MP Raksha Khadse absent from BJP meeting in Jalgaon | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार रक्षा खडसे जळगावातील भाजपच्या बैठकीला गैरहजर 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

त्या वेळी खासदार रक्षा खडसे यांनी आपण भाजप सोडणार नसल्याचे सांगितले होते.

जळगाव : एकनाथ खडसे यांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर जळगावात आज (ता.27 ऑक्‍टोबर) प्रथमच होत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे या अनुपस्थित राहिल्या आहेत. त्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. 

दरम्यान, खासदार रक्षा खडसे ह्या दिल्लीत असल्यामुळे त्या आज पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत, अशी माहिती भाजपचे जळगावचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. 

एकनाथ खडसे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही पक्षांतर केले आहे. त्या वेळी खासदार रक्षा खडसे यांनी मात्र आपण भाजप सोडणार नसल्याचे सांगितले होते. नाथाभाऊंचा तो वैयक्तीक निर्णय आहे, त्यामुळे मी पक्ष सोडणार नाही, तसेच त्यांनीही माझ्यावर भाजप सोडावा, असा दबाव आणलेला नाही, असे सांगितले होते. 

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगावात आलेल्या नाथाभाऊंचे जोरदार स्वागत झाले होते. त्या वेळी रक्षा खडसे याही त्यांच्या स्वागताला हजर होत्या. त्यांनी औक्षण करून नाथाभाऊंचे स्वागत केले होते. परंतु नाथाभाऊंच्या पक्षांतरानंतर जळगावात आज होत असलेल्या बैठकीला मात्र त्या गैरहजर राहिल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. 

दरम्यान, खडसे यांनी पक्ष सोडल्यानांतर आज जळगावात भाजपची बैठक होत आहे. त्या बैठकीस माजी मंत्री गिरीश महाजन, विजय पुराणिक यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख