राज्यात राष्ट्रपती राजवटीसाठी अमित शहांना पत्र - MP Narayan Rane demands Presidential rule in maharashtra wrote letter to amit shaha | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यात राष्ट्रपती राजवटीसाठी अमित शहांना पत्र

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 मार्च 2021

विधीमंडळ अधिवेशनादरम्यानही भाजप नेत्यांनी सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत वक्तव्य केले होते.  

मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असल्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजप नेत्याने गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. विधीमंडळ अधिवेशनादरम्यानही भाजप नेत्यांनी सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत वक्तव्य केले होते.  

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. त्यामुळे मी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. सध्या मुंबई पोलिसांचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी केला जात आहे, अशी टीकाही राणे यांनी केली.

सचिन वाझे यांना झालेल्या अटकेविषयी बोलताना राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेचे अनेक नेते वाझेंच्या संपर्कात होते. वाझेंच्या जीवावर शिवसेनेच्या नेत्यांकडून धमक्या दिल्या गेल्या. सचिव वाझेंवर शिवसेनेचा आशीर्वाद आहे. त्यामुळे वाझेंनी आतापर्यंत हाताळलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी व्हायला हवी. दिशा सालियन, सुशांतसिंह रजपुत यांच्या मृत्यूही चौकशी होण्याची गरज आहे, अशी मागणी राणे यांनी यावेळी केली. 

'ती' पांढरी इनोव्हा सचिन वाझेच वापरत होते!

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. या स्कॉर्पिओ बरोबरच एका इनोवा कारचा देखील पोलीस मागील काही दिवसांपासून शोध घेत होते. ही कार आयुक्तालयाच्या परिसरातच उभी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ मिळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यावेळी तिथे एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही येऊन गेल्याचे व तिच्या चालकाने पीपीई किट घातल्याचे सीसीटिव्ही फुटेजमधून दिसून आले होते. या कारचा शोध पोलिस घेत होते. काल NIA ने सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांना दहा तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले. NIA ने ही कारही ताब्यात घेतली आहे.

ही कार मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या क्राईम इंटिलिजन्स युनिटची (CIU) असल्याचे तपासात समोर आले असून सचिन वझे ही कार वापरत होते, अशीही माहिती समोर आली आहे. ही कार गुन्ह्यात वापरली असल्याचा संशय NIA ला आहे. त्यामुळे या प्रकरणात CIU च्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. या कारच्या पाठीमागे  POLICE असे लिहिलेले आहे. वाझे यांच्या अटकेनंतर आता NIA या प्रकरणाचा कसून तपास करत असून वाझे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख