कुस्ती संकुलासाठी खासदारांचा पुढाकार .. आठ लाखाचा निधी - MP initiative for wrestling complex   | Politics Marathi News - Sarkarnama

कुस्ती संकुलासाठी खासदारांचा पुढाकार .. आठ लाखाचा निधी

संपत मोरे
रविवार, 6 सप्टेंबर 2020

कुस्ती संकुलाच्या उभारणीसाठी सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी आठ लाखाचा निधी दिला आहे.

पुणे : अवकाळी पावसाने कोसळलेल्या कुस्ती संकुलाच्या उभारणीसाठी सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी आठ लाखाचा निधी दिला आहे. कडेगाव तालुक्यातील रायगाव येथील मल्ल कौशल्या वाघ यांच्या कुस्ती संकुलाची पडझड झाली होती. कुस्ती संकुलाच्या उभारणीसाठी खासदार पाटील धावून आले आहेत.

कडेगाव तालुक्यातील रायगाव येथे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त पैलवान कौशल्या वाघ मुलींच्यासाठी कुस्ती संकुल उभारत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी संकुल उभारणीला सुरुवात केली. पैशाची कमतरता आल्यावर त्यांनी दागिने गहाण ठेवून काम सुरू ठेवले. याच दरम्यान अवकाळी पावसाने उभारणी केलेले बांधकाम पडले. हतबल झालेल्या कौशल्या वाघ यांनी अनेकांना मदतीसाठी आवाहन केले तेव्हा खासदार संजय पाटील यांनी 'ठोस मदत देण्याचे' अभिवचन दिले होते. दिलेल्या शब्दाला जागत खासदार पाटील यांनी आठ लाख रुपयांचा निधी कौशल्या वाघ यांना दिला आहे.

कौशल्या वाघ म्हणाल्या, "संजय पाटील हे कुस्तीवर प्रेम करणारे नेते आहेत. पैलवानांच्या पाठीशी ते नेहमीच उभे राहतात. मला त्यांनी मदतीचा शब्द दिला आणि तो पाळला." कौशल्या वाघ या सांगली जिल्ह्यातील रायगाव येथील आहेत. त्यांच्या वडिलांनी मुंबईत अंगमेहनतीची कामे करून मुलीला पैलवान होण्यासाठी प्रोत्साहन दिले. अतिशय खडतर परिस्थितीत त्यांची वाटचाल झाली आहे. कुस्तीतील योगदानाबद्दल वाघ यांना राज्य शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले आहे.

हेही वाचा :  सांगली जिल्ह्यात सात आमदारांना कोरोना  

सांगली : सांगली जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत असताना राजकीय क्षेत्रातील मान्यवरही कोरोनाने बेजार झाले आहेत. जिल्ह्यातील तब्बल सात आमदारांना कोरोनाची बाधा झाली असून माजी खासदार, माजी आमदार आणि विविध पक्षाच्या प्रमुखांना कोरोनाने झटका दिला आहे.

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे आमदार सुरेश खाडे, तासगाव चे आमदार सुमनताई पाटील, खानापूरचे आमदार अनिल बाबर, जतचे आमदार विक्रम सावंत, विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम यांना कोरोनाची बाधा झाली आहे.  

यापैकी सदाभाऊ खोत आणि मोहनराव कदम हे कोरोना मुक्त होऊन पुन्हा एकदा कामाला लागले असून अन्य आमदारांच्या वर सध्या उपचार सुरू आहेत.  आमदार खाडे आणि गाडगीळ हे सध्या घरी थांबून उपचार घेत आहेत. सदाभाऊ खोत कोरोनामुक्त होऊन आंदोलनात उतरले आहेत. आमदार सुमनताई पाटील यांच्या घरातील अन्य मुलासह  अन्य सदस्यही पॉझिटिव्ह आहेत. पालकमंत्री जयंत पाटील कृषी राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम हे दोघे सुरक्षित आहेत.मात्र या सर्व आमदारांसोबत बैठकांना एकत्र असतातच त्यामुळे जिल्ह्यातील  नेत्यांची काळजी आता वाढली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख