खासदार गोपाळ शेट्टींमुळे उजळली दिव्यांग व्यक्तींची दिवाळी.... - MP Gopal Shetty donated equipment worth Rs 15 crore to the blind and disabled | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार गोपाळ शेट्टींमुळे उजळली दिव्यांग व्यक्तींची दिवाळी....

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

खासदार गोपाळ शेट्टी यांनी मात्र अकराशे अंध-अपंगांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या साह्याने तब्बल सव्वा कोटी रुपयांची उपकरणे दिली.

मुंबई : दिवाळीनिमित्त विविध लोकप्रतिनिधी फराळवाटप, उटणेवाटप, दिवाळी पहाट असे कार्यक्रम करीत असताना उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी मात्र अकराशे अंध-अपंगांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या साह्याने तब्बल सव्वा कोटी रुपयांची उपकरणे दिली.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील दहिसर, बोरिवली, चारकोप, मागाठाणे, कांदिवली येथे या उपकरणांचे वाटप करण्यात आले. भविष्यात एकाही दिव्यांग व्यक्तीला आवश्यक अशा उपकरणांची कमतरता भासता कामा नये, यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु आहेत. यापुढेही कोणाही दिव्यांग व्यक्तीला उपकरणांची आवश्यक्ता असली तर त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

यावर्षीच्या जानेवारी महिन्यातच शेट्टी यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींची हे साह्य मिळण्यासाठी नावनोंदणी केली होती. त्यांना लागणाऱ्या उपकरणांची मागणीही त्यांच्याकडून नोंदवून त्याचे अर्जही केले होते. नंतर त्यांनी केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे मंत्री थावरचंद गेहलोत यांच्याशी पत्रव्यवहार करून ती उपकरणेही मिळवून दिली. त्या उपकरणांचे वाटप नुकतेच करण्यात आले, यावेळी गेहलोत देखील वेबिनारच्या माध्यमातून हजर होते.

सुमारे अकराशे दृष्टीहीन, दिव्यांग व्यक्तींसाठी वेगवेगळी दोन हजार उपकरणे देण्यात आली. त्यांची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. या उपकरणांमध्ये बॅटरीवर चालणाऱ्या 33 तिचाकी सायकली, हाताने चालवायच्या 75 तिचाकी सायकली, 169 व्हिलचेअर, 175 कुबड्या, 116 वेगवेगळ्या काठ्या, 822 हिअरिंग एड, अंधांच्या 23 काठ्या, दोन ब्रेल किट, दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी पाच डिस्प्ले प्लेअर, दृष्टीहीनांसाठी 18 स्मार्टफोन, 102 कृत्रिम अवयव, 30 एमएसआयईडी किट, कुष्ठरोग्यांसाठी 6 किट व 28 अन्य किरकोळ वस्तूंचे वाटप यावेळी करण्यात आले.  

संबंधित लेख