खासदार अमोल कोल्हेंचे नाव राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांत नाही - MP Amol Kolhe is not in the list of star campaigners of NCP for Bihar assembly election | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार अमोल कोल्हेंचे नाव राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांत नाही

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

अमोल कोल्हेंच्या सभांना बिहारमध्येही प्रतिसाद मिळाला असता?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बिहारची विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली असून निवडणूक प्रचारासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीचे मुख्य स्टार प्रचारक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच असतील, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी पक्षाच्या दिल्ली येथील केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती कशी असेल याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक लवकरच माध्यमांशी संवाद साधतील, असे पक्षाचे प्रवक्त महेश  तपासे यांनी सांगितले.

या यादीत शरद पवार यांच्याशिवाय राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, सुनिल तटकरे, फौजिया खान, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय सचिव नरेंद्र शर्मा या महाराष्ट्रातील नेत्यांचा समावेश आहे. इतर सारे स्टार प्रचारक उत्तरेतील आहेत. या यादीत पक्षाचे महाराष्ट्रातील स्टार प्रचारक अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नावाचा मात्र समावेश नाही. अमोल कोल्हे हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रमुख आकर्षण होते. त्यांच्या मालिकांमधील ऐतिहासिक भूमिकांमुळे  ते घराघरांत पोहोचले होते. त्याचा चांगला परिणाम साहजिकच त्यांच्या सभांसाठी होणाऱ्या गर्दीवर झाला होता. मोठ्या प्रमाणात तरुण त्यांच्या सभांसाठी उपस्थित राहत होते. छत्रपती संभाजी महाराजांची ते व्यक्तिरेखा साकारत असल्याने लहानथोर व्यक्तीही त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी निवडणूक प्रचारात धडपडत होती. बिहारच्या निवडणूक प्रचारात त्यांना स्थान का दिले नाही, याची त्यामुळे चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी या दोन अमोलनी अनमोल कामगिरी राष्ट्रवादीसाठी विधानसभा निवडणुकीत बजावली, अशी प्रशंसा खुद्द अजित पवार यांनी केली होती.

पक्षाेन इतर नेमलेले स्टार प्रचारक पुढीलप्रमाणे :- राष्ट्रीय सचिव राजीव झा, राष्ट्रीय सचिव व राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा, राष्ट्रीय महासचिव के. के. शर्मा, राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग, राष्ट्रीय सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव, राष्ट्रीय सचिव के. जे. जोसेमन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, राष्ट्रीय सरचिटणीस पुष्पेंद्र मलिक, राष्ट्रीय सरचिटणीस सीमा मलिक, सहकार विभाग राष्ट्रीय अध्यक्ष विरेंद्र सिंग, सफाई कामगार सेल राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार, हरियाणा प्रदेशाध्यक्ष वेदपाल चौधरी, उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव, अॅड. एस. पी. शर्मा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस मुरलीमनोहर पांडे,  बिहारचे माजी प्रदेशाध्यक्ष नवलकिशोर साही, बिहारचे प्रदेशाध्यक्ष राहत काद्री, बिहार अनुसूचित जाती/जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र पासवान, बिहारच्या माजी प्रदेशाध्यक्ष ललिता सिंग, बिहार कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष संजय केशरी, बिहारचे माजी सरचिटणीस इस्तियाक आलम, बिहारचे प्रदेश सरचिटणीस अकबर अली, बिहारचे माजी प्रदेश सरचिटणीस मनोज जैस्वाल, बिहार आयटी सेलचे अध्यक्ष खुशारो आफ्रीदी, राष्ट्रीय किसान काँग्रेसचे माजी प्रद्श सरचिटणीस ब्रिजबिहारी मिश्रा, बिहारचे माजी प्रदेश सरचिटणीस शकील अहमद, बिहारचे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अझर आलम, बिहार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष इंदू सिंग, बिहार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे चांदबाबू रहेमान, बिहार माजी सरचिटणीस चंद्रेश कुमार, बिहार माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग आदींचा समावेश आहे.

स्टार प्रचारकांच्या सभांसाठी होणारा खर्च हा उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जात नाही. शिवसेनेनेही बिहारची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी वीस स्टार प्रचारकांची यादी पक्षाने प्रसिद्ध केली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे व्हर्च्युअल रॅलीद्वारे संवाद साधणार असल्याचे सांगण्यात आले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख