मार्च महिना सचिन वाझेंसाठी धोक्याचा : तेव्हाही आणि आतादेखील!

एनआयए आणि एटीएस या दोन्ही तपास संस्थाची वाझे यांच्यावर नजर
waze-yunus
waze-yunus

पुणे :  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडचणीत सापडलेले पोलिस अधिकारी सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसने खळबळ उडाली आहे. जगाला गुडबाय म्हणण्याची वेळ आली असल्याचे स्टेटस त्यांनी ठेवल्याने त्यांचे वरिष्ठ अधिकारीही बुचकळ्यात पडले. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यांतर त्यांनी ते स्टेटस बदलले आहे. वाझे यांची आज दिवसभर राष्ट्रीय तपास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यामुळे त्यांनी हे स्टेटस काय ठेवले, याबाबत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

हे स्टेटस ठेवताना त्यांना 3 मार्च 2004 या तारखेचा उल्लेख केला आहे. याच दिवशी त्यांच्यावर ख्वाजा युनूस याच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तेथून त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या. कोर्टाच्या फेऱ्या, निलंबन, राजीनामा, राजीनामा मंजूर न होणे अशा अनेक बाबी घडल्या. आता बरोबर 2021 या वर्षाच्या मार्च महिन्यातच त्यांच्या विरोधात टिकेचे स्वर तीव्र स्वरुपात येऊ लागले आहेत. विधीमंडळात त्यांच्यावर आरोप झाले. एनआयएने चौकशी केली. एफआयआरमध्ये नाव आले. एकूणच मार्च महिना हा वाझेंसाठी धोक्याचा ठरला. तेव्हा आणि आताही! मनसुऱ हिरेन यांचा मृतदेह मार्चमध्ये सापडल्यानंतर एकामागोमाग एक अडचणी वाझेंसमोर वाढत गेल्या.  

हिरेन यांच्या पत्नीने फिर्याद देताना वाझे यांचा थेट उल्लेख केल्याने त्यांच्या अटकेची शक्यता व्यक्त होत आहे. म्हणूनच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी केेलेला अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. हा अर्ज फेटाळल्यानंतरच वाझे यांची निराशा व्यक्त करणारी आणि आपल्याला 2004 प्रमाणेच पुन्हा गोवण्याचा कट असल्याची तक्रार करणारे स्टेटस ठेवले होते. 2004 मध्ये माझ्याकडे माझा उरलेला सेवाकाला होता. धैर्य होते. आता ते देखील नाही, अशी हताश भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर १९ मार्च रोजी होणार सुनावणी आहे.

काय आहे ख्वाजा युनूस प्रकरण? 

घाटकोपर येथे दोन डिसेंबर 2002 मध्ये बसमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. यात दोघांचा मृत्यू तर 39 लोक जखमी झाले होते. या प्रकरणी इंजिनिअर असलेल्या व मूळचा परभणी येथील 27 वर्षाच्या ख्वाजा युनूसला अटक करण्यात आली होती. 6 जानेवारी 2003 मध्ये त्याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचा दावा पोलिसांनी केला. त्याला चौकशीसाठी औरंगाबादला नेत असतानाच तो फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले प्रत्यक्षात त्याचा मृत्यू पोलिस मारहाणाीत झाल्याची तक्रार करण्यात आली. तेथूनच वाजे यांचे ग्रह फिरले. याच प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. त्याचीच तर पुनरावृत्ती होत नाही ना, अशी शंका वाझेंना वाटत असावी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com