भामा आसखेड धरणग्रस्तांवरून मोहिते-गोरे आमने सामने  - Mohite-Gore criticizes each other over Bhama Askhed dam victims | Politics Marathi News - Sarkarnama

भामा आसखेड धरणग्रस्तांवरून मोहिते-गोरे आमने सामने 

हरिदास कड 
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

या आंदोलनाच्या प्रश्नावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आणि शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्यात जुंपली आहे.

चाकण (जि. पुणे) : भामा-आसखेड धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या पाहिजेत, जमिनीला जमीन मिळावी, या मागणीसाठी तसेच पुणे महापालिकेच्या जलवाहिनीचे काम रोखण्यासाठी ता. 31 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. काही आंदोलनकर्त्यांना अटकही झाली. 

या आंदोलनाच्या प्रश्नावरून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते आणि शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांच्यात जुंपली आहे. मोहिते यांनी आंदोलकांची बाजू न घेतल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांच्या कानी हा प्रश्‍न घालणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. मोहिते यांनी गोरे यांच्यावर टीका न करता "ज्या एजंटांनी, नेत्यांनी मोक्‍याच्या जमिनी लाटल्या, त्याची चौकशी व्हावी,' अशी मागणी केली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मोहिते यांच्या मागणीनुसार चौकशीचे आदेश दिले, त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी असे राजकारण खेड तालुक्‍यात रंगले आहे. 

धरणग्रस्तांच्या पुणे येथील बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी काहींनी आंदोलनाच्या नावाखाली अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मोक्‍याच्या जमिनी लाटल्या आहेत, त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे आदेश दिले. दादा खरे बोलले, याचे काही धरणग्रस्तांना समाधान वाटले. पण, काही आंदोलन कार्यकर्त्यांना मात्र दादांचा हा आदेश झोंबला. त्यानंतर झालेल्या आंदोलनात काही आंदोलन कार्यकर्त्यांनी लोकांना चिथावणी दिली. काहींनी पडद्यामागे राहून आंदोलन भडकवले. आंदोलनात उपमुख्यमंत्री पवार यांना टीकेचे लक्ष करण्यात आले. 

माजी आमदार गोरे यांनी धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या पाहिजेत. त्यांना वाढीव मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी करून आमदार मोहिते धरणग्रस्त शेतकऱ्यांची बाजू घेत नाहीत, प्रशासनाची बाजू घेतात. ज्यांची एजंट म्हणून चौकशी करायची, त्यांची खुशाल चौकशी करा. पण काही शेतकरी आहेत. त्यांना न्याय मिळावा, असे सांगितले. 

गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे सरकार होते, त्या काळात का प्रश्न सोडविले गेले नाहीत, असा आरोप आमदार मोहिते यांनी केला आहे. काही धरणग्रस्तांच्या नावाने फायली करून जमिनी चाकण परिसरात मिळविल्या गेल्या आणि त्यांची विक्रीही लाखो रुपयांना करण्यात आली आहे, त्याचीही चौकशी केली पाहिजे, अशी मागणी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची आहे. 

आंदोलन केले म्हणून पोलिसांनी भामा-आसखेड धरणग्रस्तांवर गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत. सुरू असलेले जलवाहिनीचे काम थांबवावे, अशी मागणी माजी आमदार सुरेश गोरे यांनी केली आहे. वेळ पडल्यास शिवसेना या जलवाहिनीविरोधात आंदोलन करेल, असा इशाराही गोरे यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख