खासदार डेलकर यांनी आत्महत्या का केली?

स्वाभिमानासाठी एका खासदाराला प्राणाचे मोल द्यावे लागले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आता काय करणार आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
mohan28.jpg
mohan28.jpg

मुंबई : सात वेळा लोकसभेचे सदस्य असलेल्या मोहन डेलकर यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हायला हवी. डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या का केली? गुजरात, दिल्लीत त्यांची घरे आहेत. पण मुंबईचे पोलीस आपल्या मृत्यूनंतर ‘सुसाईड नोट’ हा पुरावा मानून आरोपींना अटक करतील ही भावना त्यांच्या मनात नक्कीच असेल. आपल्या झुंजारपणासाठी, स्वाभिमानासाठी एका खासदाराला प्राणाचे मोल द्यावे लागले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आता काय करणार आहेत? असा सवाल 'सामना'च्या 'रोखठोक' मधून खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मोहन डेलकर हे हिंमतबाज होते, ते पळपुटे नव्हते. ते आत्महत्या का करतील ? त्यांना जय-पराजयाची चिंता कधीच वाटली नाही. अशा डेलकरांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलात फासावर लटकलेला आढळतो व सगळे चूप आहेत. एका नटाची आत्महत्या खळबळ माजवते, एका नटीचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यावर हलकल्लोळ होतो, पण सातवेळा निवडून आलेले एक खासदार मुंबईत संशयास्पदरीत्या मृत पावतात त्यावर कोणी काहीच आपटायला तयार नाही. मोहन डेलकर यांनी एक ‘सुसाईड नोट’ गुजरातीत लिहून ठेवली. ही नोट खरी असेल तर त्यात डेलकरांनी नक्की काय लिहिले ? दादरा-नगर हवेलीचे प्रशासक डेलकरांचा छळ करीत होते, भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. आपल्याला विरोध करणारा राजकारणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ता, चळवळ यांची मानसिक कोंडी करून त्यांना आत्महत्येच्या कडय़ावर न्यायचेच अशी काही योजना ठरली आहे काय? मोहनने आत्महत्या केली, तो खून नाही हे मान्य केले तर मग ती का केली? असा पुढचा प्रश्न उपस्थित होतो. सिल्वासा, दादरा-नगर हवेली हा लहान केंद्रशासित प्रदेश. त्या प्रदेशातला खरा लोकनेता मोहन डेलकरच होता. अशा मोहन डेलकरांना आत्महत्या करावी लागली. मग त्यांचा वाद कुणाशी होता व शेवटचे प्रोव्होकेशन कोणाचे होते? मोहन डेलकर राजकारणात होते. ते दबंग होते म्हणून त्यांचा संशयास्पद मृत्यू दुर्लक्षित करून चालणार नाही, असे 'रोखठोक'मध्ये नमूद केलं आहे.

लोकसभेत खासदार डेलकर यांना दोन मिनिटांची श्रद्धांजली वाहिली जाईल. पण तेवढय़ाने काय होणार? डेलकरांच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी संपूर्ण सभागृहात आवाज उठवायला हवा. केंद्रशासित राज्यांत आमदार, खासदारांना, निवडून आलेल्या सरकारांना कसे अपमानित केले जाते त्या दुःखास डेलकरांनी लोकसभेत वाचा फो़ली. पुद्दुचेरीत तेथील नायब राज्यपाल माजी मुख्यमंत्री नारायणसामी यांना पावलोपावली अपमानित करीत होत्या. तेथे सरकारचीच हत्या झाली व दादरा-नगर हवेलीत खासदार डेलकरांचा बळी घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला दादरा-नगर हवेलीच्या प्रशासनाने आपल्याला कसे अपमानित केले त्याबाबत डेलकरांनी डोळय़ात पाणी आणून सांगितले. डेलकर अस्वस्थ होते व प्रशासकीय दडपशाहीने ते असहाय्य बनले. त्याच असहाय्यतेतून संसदेचा एक सदस्य, एक लोकप्रतिनिधी दुःखद आत्महत्या करतो. आपल्या झुंजारपणासाठी, स्वाभिमानासाठी एका खासदाराला प्राणाचे मोल द्यावे लागले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आता काय करणार आहेत, असा रोखठोक सवाल राऊत यांनी केला आहे.


काय म्हणतात संजय राऊत...
 
सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान आहे. मोहन डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही. गेली किमान 20-22 वर्षे मी त्यांना जवळून ओळखतो. हा माणूस सगळय़ांना थेट भिडणारा आणि नडणारा होता. तो मैदानावरून पलायन करील असे कधीच वाटले नाही. सुशांत राजपूतने त्याच्या एका सिनेमात ‘आत्महत्या करू नये. निराश होऊ नये,’ असे संवाद फेकले. त्यामुळे सुशांतसारखा खंबीर मनाचा तरुण आत्महत्या कसा करील? सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची ‘पटकथा’ तयार झाली. त्या कथाकारांना डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये? डेलकर यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली, स्वतःचा अत्यंत दारुण शेवट त्यांनी करून घेतला याबद्दल किती जण हळहळले?  

Edited  by :  Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com