मनसेचे सरकारला अल्टिमेटम..सोमवारपर्यंत वाढीव बिल माफ करा.. अन्यथा आंदोलन.. - MNS ultimatum to the state government forgive the increased bill till Monday  otherwise agitation | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेचे सरकारला अल्टिमेटम..सोमवारपर्यंत वाढीव बिल माफ करा.. अन्यथा आंदोलन..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

'सोमवारपर्यंत कुणीही वाढीव वीज बिल भरू नये,' असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी नागरिकांना केले आहे.

मुंबई : 'वाढीव वीज बिल भरू नका,' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांना केलं आहे. वाढीव बिलाबाबत सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, हा महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात आहे. वाढीव बिलाबाबत राज्य सरकारनं सोमवारपर्यंत निर्णय घ्यावा, अनथा मनसेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत आज दिला आहे. 

बाळा नांदगावकर म्हणाले, "वाढीव बिलाबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संवाद साधला होता. शरद पवार यांनी याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे सांगितले होते. पण शरद पवार यांच्या शब्दाला राज्य सरकारध्ये किंमत नसल्याचे दिसते. याबाबत शरद पवार यांनी सरकारला आदेश दिला पाहिजे."

'सोमवारपर्यंत कुणीही वाढीव वीज बिल भरू नये,' असे आवाहन बाळा नांदगावकर यांनी नागरिकांना केले आहे. नागरिकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन नांदगावकर  सांगितले. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये श्रेयवादांची लढाई सुरू आहे, असा आरोप बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारवर केला आहे.    

'सोमवारपर्यंत बील माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्या जिल्ह्यात जनआंदोलन करण्यात येईल, ' असा इशारा मनसेने दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर यांनी ही घोषणा केली. 

हेही वाचा : राज्य सरकारमधील घटक पक्षांत ताळमेळ नाही 
पुणे : "महाविद्यालये बंद आहेत, परीक्षा नाहीत, अभ्यासिका बंद आहेत, त्यामुळे सरकारचे धोरण कळत नाही. या मतदारांत चीड आहे.  राज्य सरकारमधील घटक पक्षांत ताळमेळ नाही," असा आरोप विधान परिषदेतील विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दरेकर आले होते.  प्रवीण दरेकर म्हणाले, "भाजपने केलेली कामे आणि पक्षाची भविष्यातील धोरणे पाहता या पक्षावर पदवीधरांचा विश्वास आहे. त्यामुळे संग्राम देशमुख यांना मतदारांची पसंती मिळेल. भाजपचे देशमुख निवडून आल्यास पदवीधरांना नोकरी मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. या घटकाला उद्योग क्षेत्रात प्रोतसाहन देऊ."

पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघातूनही तिकिट न मिळाल्याने पुण्यातील इच्छुक महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे नाराज नाहीत. कुलकर्णी नाराज नाहीत, त्यांची काळजी भाजप घेईल. आमच्याकडे मतभेद नाहीत. राज्य सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते कॅाग्रेसची फरपट करीत आहे. हे या पक्षाला कळायला हवे, असे दरेकर यांनी स्पष्ट केलं. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख