पंढरपुरात मनसे, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव...  - MNS Shiv Sena, deprived Bahujan Aghadi celebration in Pandharpur | Politics Marathi News - Sarkarnama

पंढरपुरात मनसे, शिवसेना, वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव... 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज दर्शनास खुले झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत पंढरपूरात लाडू, पेढे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला .

पंढरपूर :  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज दर्शनास खुले झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत पंढरपूरात लाडू, पेढे मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा केला .

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोरोना संसर्गामुळे आठ महिने बंद होते. आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन सुरू झाल्यानंतर आनंद साजरा होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश संघटक दिलीप धोत्रे यांनी राज ठाकरे आणि वारकरी मंडळी ची भेट घडवून दिली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुध्दा पंढरपूरात आंदोलन केले होते. तर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतल्याचे स्वागत केले.

संत नामदेव पायरी जवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना ,वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांनी उपस्थित भाविकांना लाडू, पेढा, मिठाईचे वाटप केले. दर्शन सुरू झाल्याचा आनंद सर्वानी व्यक्त केला.  विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना सुध्दा मिठाई भरवली.

प्रार्थनास्थळे सुरु करणे हे उशीरा सुचलेले शहाणपण - आठवलेंची टीका
महाराष्ट्रात सर्वधर्मीय  प्रार्थनास्थळे सुरू करावीत या साठी रिपब्लिकन पक्षाने राज्यभर आंदोलन केले होते. उशिरा का होईना पण चांगला निर्णय घेऊन राज्य सरकार ने सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. 

कोरोना चा प्रसार होऊ याची खबरदारी घेऊन सर्व नियम पाळून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करावीत अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी होती. त्यासाठी रिपाइं ने राज्यभर आंदोलन केले. दिवाळी पाडव्या पासून सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे सुरू करण्याचा निर्णय हे राज्य सरकार ला उशिरा सुचलेले शहाणपण असले तरी या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे आठवले म्हणाले. 
 
नियमांची अंमलबजावणी करा 

महाराष्ट्रातील लाखो वारकरी, हिंदुत्वप्रेमी जनता, मंदिरावर उपजिविका अवलंबून असणा-यांची ही मागणी होती. त्यांचा रेटा व दबाव सरकारवर होता, त्यामुळेच उशिरा को होईना सरकारला निर्णय घ्यावा लागला. त्याचे स्वागत आहे पण हा निर्णय अगोदरच व्हायला हवा होता. मंडई, मॉल्स, रेस्टॉरन्टस, बार, जीम्स, व अन्य सार्वजनिक स्थळे खुली केली होती. वारकरी सांप्रदायाने अतिशय जिव्हाळ्याने मंदिरे उघडण्याची भूमिका मांडली होती, त्यामुळे सरकारने आधीच हा निर्णय घेणे अपेक्षित होते. पण केवळ अहंकार व प्रतिष्ठेमुळे सरकारने हा निर्णय घेतला नाही. कोरोनाचे संकट असताना मंदिरे उघडल्यामुळे जनतेला दिलासा मिळेल, त्यामुळे जनेतेने सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख