मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा विनापरवानगी लोकल प्रवास.. - MNS leader Sandeep Deshpande Santosh Dhuri's local journey without permission  | Politics Marathi News - Sarkarnama

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा विनापरवानगी लोकल प्रवास..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

मनसेचे नेते अविनाश जाधव यांना रेल्वे पोलिसांनी ठाण्यात रेल्वेने प्रवास करण्यास रोखले आहे. ठाणे रेल्वे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मुंबई : सामान्य जनतेसाठी रेल्वेने प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज मुंबईत रेल्वे प्रवास आंदोलन करण्यात आले. मनसेनेचे नेत संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे यांनी विनापरवानगी रेल्वेने प्रवास करून आंदोलनास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रविंद्र मोरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी रेल्वेने प्रवास केला. मनसेचे नेते अविनाश जाधव यांना रेल्वे पोलिसांनी ठाण्यात रेल्वेने प्रवास करण्यास रोखले आहे. ठाणे रेल्वे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

मुंबईकरांचे होत असलेले हाल लक्षात घेता त्यांना रेल्वेने प्रवास करू द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी यांनी सरकारकडे केली आहे. आज जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास असे आंदोलन मनसेतर्फे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर दादर पोलिस व रेल्वे पोलिसांनी संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना 

रेल्वेने प्रवास केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी नोटिस काल पाठविली होती. या नोटिशीला केराची टोपली दाखवून मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी आपल्या भूमिकेवर ठाम होते.  आहे. 

लोकल बंद असल्यानं उपनगरीय नागरिकांचे हाल होत आहे. मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सुरू करावी, अशी मागणी मनसेने रेल्वेकडं केली आहे. लॅाकडाउनमुळे रेल्वे बंद आहे, तर आता बससेवा सुरू करण्यात आली आहे. पण बसमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता व हा गर्दीचा त्रास वाचवायचा असेल तर रेल्वे सुरू करा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. घरात बसून जे सरकार चालवित आहे, त्यांना जनतेची काळजी नाही, अशी टिका देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली आहे.  

राज्य सरकार एकीकडे बेस्ट बसची संख्या हळूहळू वाढवली आहे, मात्र लोकलचा भार पेलण्याइतकी ही बससेवा सक्षम नाही. प्रवाशाची वाढती संख्येमुळे या बससेवेवर ताण वाढत आहे. गर्दीने भरलेल्या बसने प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. अनेक वेळा बस थांबवली जात नसल्याने प्रवाशांना अनेक तास बसची वाट पाहत राहावे लागते. त्यामुळे लोकल लवकर सुरु करण्याची मागणी मनसेकडून वारंवार केली जात आहे. 

लोकलमधून प्रवास करण्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा असल्याने इतरांना बसशिवाय पर्याय नाही. अन्य प्रवासाची साधने नसल्याने बसने येण्या-जाण्यातच दिवसाचा निम्मा वेळ खर्ची पडत असल्याची तक्रार होत असल्याचे मनसेने स्पष्ट केलं आहे. वसई-विरार, नालासोपारा, ठाणे डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, बदलापूर, कसारा, कर्जत या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची कामावर जाण्यासाठी गैरसोय होत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख