शिवसेना इतकी का वैतागली..? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल  - MNS leader Sandeep Deshpande criticizes Shiv Sena | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना इतकी का वैतागली..? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 5 सप्टेंबर 2020

अन्य महत्वाच्या मुद्दावरून जनतेचं लक्ष हटविण्याचं हे षडयंत्र तर नाही ना, याचा विचार जनतेनं केला पाहिजे, असे देशपांडे यांनी सांगितलं.

मुंबई : "पाच पैशाची किंमत नसलेल्या कंगणा राणावतच्या वक्तव्यावर शिवसेना इतकी का वैतागली? महाराष्ट्रात अनेक महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर अजून सरकार गप्प आहे ?" अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी याबाबतचा व्हिडिओ टि्वटरवर शेअर केला आहे.

मंदिरात नागरिकांना बंदी, लाखो तरून बेरोजगार आहे. कोरानामुळे लाखो लोकांचे बळी जात आहेत. मुख्यमंत्री घरात बसून काम करीत असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. रेल्वेसेवा बंद असल्यामुळे प्रवासाविना लोकांचे हाल होत आहे.या सर्व गोष्टीवरून लक्ष हटविण्यासाठी ज्या व्यक्तीची पाच पैशाची किमंत नाही, अशा व्यक्तीला शिवसेना किमंत देत आहे. अन्य महत्वाच्या मुद्दावरून जनतेचं लक्ष हटविण्याचं हे षडयंत्र तर नाही ना, याचा विचार जनतेनं केला पाहिजे, असे देशपांडे यांनी सांगितलं.

पाकव्याप्त काश्मीरशी मुंबईची तुलना करणारी अभिनेत्री कंगना रनौत हिच्या निषेधार्थ काल मुंबईत अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली. मागाठाणे येथे महिला शिवसैनिकांनी तिच्या फोटोला काळे फासले. मागाठाणे येथे टाटा पॉवर हाऊस जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन झाले. माजी नगरसेविका व सोलापूर जिल्हा संघटक संजना घाडी तसेच नगरसेविका व विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली महिला शिवसैनिकांनी येथे तीव्र आंदोलन केले.

या वेळी शिवसैनिकांनी कंगनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या व फलकही फडकवले. मुंबईत येऊन बॉलीवूडमध्ये नावलौकिक मिळविणाऱ्या कंगनाने मुंबईशी कृतघ्नपणा दाखवला आहे. मुंबईत येण्यापूर्वी कंगना ला कोणीही ओळखत नव्हते. ज्या शहराने तिला प्रसिद्धी, नाव, मानमरातब, पैसा मिळवून दिला, त्याच शहराबद्दल तिने वाईट उद्गार काढले. खरा मुंबईकर याबद्दल तिला कधीही माफ करणार नाही, असे संजना घाडी यांनी या वेळी बोलून दाखवले.

शिवसैनिकांनी कंगनाच्या फोटोला काळेही फासले, नंतर त्या फोटोला जोड्यांना मारून तो फोटो जाळण्यातही आला. या वेळी नगरसेविका रिद्धी खुरसंगे, गीता सिंघण,  संध्या दोशी, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस हजर होते. घाटकोपर, कुर्ला येथेही शिवसैनिकांनी तीव्र निदर्शने केली.
 Edited  by : Mangesh Mahale  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख