राजदंड पळवणाऱ्या आमदार राणांना मार्शल्सनी काढले सभागृहाबाहेर  - MLA Ravi Rana's confusion in the assembly | Politics Marathi News - Sarkarnama

राजदंड पळवणाऱ्या आमदार राणांना मार्शल्सनी काढले सभागृहाबाहेर 

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 6 जुलै 2021

रवी राणा हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राजदंड उचलण्यासाठी पुढे गेले असता जाधव यांनी त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : सोमवारी विधानसभेमध्ये (Assembly Session) ओबीसींच्या (OBC) राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या गोंधळानंतर भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. निलंबनावरुन पडसाद आजही पहायला मिळाले. भाजपने विधानसभेच्या आवारामध्येच प्रतिविधानसभा भरवण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले. मात्र, दुसरीकडे आमदार रवी राणा  (Ravi Rana) यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घातल राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शल्सला दिले. (MLA Ravi Rana's confusion in the assembly) 

रवी राणा हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राजदंड उचलण्यासाठी पुढे गेले असता जाधव यांनी त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला. तुम्ही स्टंटबाजी करु नका. तुम्हाला बोलायची संधी मिळेल, असे जाधव यांनी राणा यांना सांगितले. मात्र राणा थांबले नाहीत. त्यामुळे जाधव यांनी सभागृहातील आपल्या अध्यक्षांच्या खुर्चीमधून उठून रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर रवी राणा यांना सभागृहाबाहेर काढण्यात आले. 

हेही वाचा : नाणारचे समर्थन करत शेकडो शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश

दरम्यान, भाजपने अधिवेशनावर बहिष्कार टाकत विधान भवनाच्या बाहेर अभिरूप विधानसभा भरवली होती. वृत्तवाहिन्यांवरुन या अभिरुप विधानसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू केल्याने आक्षेप घेण्यात आला. यावर हे प्रक्षेपण तातडीने थांबवण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले.

आमदारांच्या निलंबनानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांनी आंदोलन केले. त्यानंतर सभागृहाबाहेरच भाजपने प्रतिविधानसभा भरवली. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले आहे होते. मात्र, या साठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे ते थांबवण्याचे आदेश देण्यात आले. 

हेही वाचा : भास्कर जाधव यांनी अनिल कुंबळेचे रेकॅार्ड मोडले...एकाच इनिंगमध्ये १२ बळी!

भाजपच्या प्रतिविधानसभेवर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला होता. विधानसभेच्या आवारात परवानगी नसताना काहीही करता येत नाही. विरोधक तिथे स्पीकर लावून भाषणे देत आहेत. भास्कर जाधव यांच्या आक्षेपावर अध्यक्षांनी सांगितले, होते की विरोधी पक्षाने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांचा माईक बंद केला पाहिजे, अशी मागणी जाधव यांनी केली होती. त्यानंतर भास्कर जाधव यांची तालिका अध्यक्ष पदी नियक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या अभिरुप विधानसभेचे कामकाज बंद करण्याचे आदेश दिले.

Edited By - Amol Jaybhaye   

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख