गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मुलाला अटक : सुमारे 530 कोटींचा जीएसटीला चुना! - MLA Ratnakar Gutte’s son arrested in fake tax invoice scam | Politics Marathi News - Sarkarnama

गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मुलाला अटक : सुमारे 530 कोटींचा जीएसटीला चुना!

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

गुट्टे यांच्या विजय नावाच्या मुलावर या आधी अशाच एका प्रकरणी कारवाई झाली होती.... 

मुंबई : राज्यात शुगर बॅरन म्हणून ओळखले जाणारे रत्नाकर गुट्टे यांच्या कुटुंबातील सदस्य पुन्हा कायदेशीर कारवाईत अडकले आहेत. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरणी त्यांचचा मुलगा सुनील यास  अटक करण्यात आली असून त्यांना न्यायलयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

सुुनील हायटेक इंजीनिअरिंग लिमिटेडचे संचालक म्हणून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच आयटीसीचा वापर आणि दुसऱ्याला दिल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली. वस्तू किंवा सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बोगस पावत्यांच्या बळावर, 520 कोटी रुपये आयटीसी मिळवल्याचा आरोप सुनील यांच्यावर आहे. तब्बल सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे बनावट इनव्हाॅईस बनविण्यात आले आहेत. 

नवी दिल्ली, हैदराबाद, लुधियाना, गुरगाव, मीरत, अहमदाबाद, मीरत, अहमदाबाद आणि कोलकत्ता येथील अनेक कंपन्या या सुनील हायटेक इंजिनिअर्सशी संबंधित असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे..

केवळ टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी नव्हे तर कंपन्यांची उलाढाल कृत्रिमरित्या वाढवून दाखविण्यासाठी या बोगस बिलांचा वापर करण्यात आला. उलाढाल जास्त वाढवून दाखविल्याने कर्जाची मर्यादा आणि बॅेकेकडूनही जादा कर्ज मिळण्यासाठी त्याचा उपयोग झाला. या साऱ्या प्रकारात सुनील हायटेक एक प्रमुख असल्याचे डीजीसीआयने म्हटले आहे. सुनील यांच्याशिवाय श्री ओशिया फेरा अलाॅय लिमिटेडचे विजय रांका यांनाही अटक करण्यात आली आहे. रांका यांच्या कंपनीने सुमारे 1371 कोटी रुपयांची बिले सादर केली होती. त्यातून सुमारे 209 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यात आले.

सुनील आणि रांका या दोघांनाही जीएसटी कायद्याच्या कलम 69 (1) नुसार कारवाई करण्यात आली. मालाचा कोणताही पुरवठा न करता बोगस बिले तयार करून इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. सुनील हायटेक ही कंपनी 2019मध्ये दिवाळखोरीत निघाली आहे. सुमारे 2300 कोटी रुपयांचे देणे या कंपनीकडे थकीत आहे.

सुनील यांचे भाऊ विजय गुट्टे यांनाही अशाच एका प्रकरणात अटक झाली होती. त्यांच्यावर सुमारे 34 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. विजय गुट्टे यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावरील द अॅक्सिडेन्टल प्रायमिनिस्टर,` हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

रत्नाकर गुट्टे यांची गंगाखेड शुगर फॅक्टरीवरही मनी लाॅडरिंग अंतर्गत सक्तवसुली संचालनालयातर्फे कारवाई सुरू करण्यात आली होती. या कंपनीने आंध्रा बॅंक, युको बॅंक, युनायटेट बॅंक आॅफ इंडिया, बॅंक आॅफ इंडिया, सिंडिकेट बॅंक यांचे तब्बल 328 कोटी रुपये थकविले होते. गुट्टे यांनी 2014 मध्ये भाजपकडून गंगाखेडमधून विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2019 ची निवडणूक गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून पण भाजपच्या चिन्हावर लढविली होती. अर्ज भरला तेव्हा ते तुरुंगात होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख