काँग्रेस आमदाराला व्हिडिओ कॅाल करून महिलेचे अश्लील चाळे अन् नंतर ब्लॅकमेलिंग - MLA Neeraj Dixit lodges police complaint alleging that woman made video call performed obscene acts | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेस आमदाराला व्हिडिओ कॅाल करून महिलेचे अश्लील चाळे अन् नंतर ब्लॅकमेलिंग

वृत्तसंस्था
बुधवार, 26 मे 2021

यामध्ये एखादी टोळी सक्रीय असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

भोपाळ : काँग्रेस आमदाराच्या घरात त्यांच्या जवळच्या मैत्रिणीने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्येही काँग्रेसचेच आमदार अडकले आहेत. एक अनोळखी महिला त्यांना व्हिडिओ कॅाल करून अश्लील चाळे करत होती. हा कॅाल रेकॅार्ड करून त्याची क्लीप बनवत आमदारांना ब्लॅकमेलिंग केले जात होते. याबाबत संबंधित आमदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (MLA Neeraj Dixit lodges police complaint alleging that woman made video call performed obscene acts)

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार नीरज दीक्षित यांनी याबाबत पोलिस तक्रार दिली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार उमंग सिंघार यांच्या बंगल्यात सोनिया भारद्वाज या त्यांच्या मैत्रिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणात सिंघार यांच्यावर आत्महत्तेला प्रवृत्त केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, सोनिया यांच्या मुलाने सिंघार यांची बाजू घेत गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. 

हेही वाचा : यास धडकले; बंगाल व ओडिशातील अनेक गावांत जलप्रलय

त्यातच आता काँग्रेस आमदाराला एका महिलेने ब्लॅकमेलिंग केल्याचे समोर आले आहे. नीरज दीक्षित यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मागील काही दिवसांपासून त्यांच्या मोबाईलवर मेसेज येत होते. विधानसभा क्षेत्रातील एखाद्या गरजूचा मेसेज असेल असा विचार करून त्यांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर महिलेने व्हिडिओ कॅालिंग करूनही त्रास देण्यास सुरूवात केली. एकदा महिलेने व्हिडिओ कॅालिंग सुरू असतानाच अश्लीच चाळे करण्यास सुरूवात केली. या प्रकारानंतर दीक्षित यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. व्हिडिओ कॅालची क्लीप बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचेही समोर आले आहे. ब्लॅकमेलिंग करणारी महिला कोण आहे, हे माहिती नसल्याचे दीक्षित यांनी पोलिसांना सांगितले आहे. 

टोळी असण्याची शक्यता

पोलिस उपायुक्त शशांक जैन यांनी सांगितले की, अशा प्रकारचे सायबर गुन्हे घडत आहेत. अनेकदा महिला व्हिडिओ कॅाल करून अश्लील चाळे करतात. हा कॅाल रेकॅार्ड करून नंतर त्याआधारे संबंधित व्यक्तीला ब्लॅकमेल करू लागतात. पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे. लवकरच ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेपर्यंत पोहचू. यामध्ये एखादी टोळी सक्रीय असण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सिंघार यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची नुकतीच भेट घेतली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले. कमलनाथ यांनी दुरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर बैठकीत बोलताना त्यांनी आमच्याकडेही हनीट्रॅपचा पेनड्राईव्ह असल्याचा धमकीवजा इशारा भाजप सरकारला दिला होता. त्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. त्यातच दीक्षित यांना ब्लॅकमेलिंगचा प्रकार समोर आला आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख