गृहमंत्री देशमुखांच्या मदतीला नाना पटोले आले धावून!

मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आज विधानसभेचे सभागृह दणाणून सोडले.
MLA Nana Patole helps Home Minister Anil deshmukh in assembly
MLA Nana Patole helps Home Minister Anil deshmukh in assembly

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी आज विधानसभेचे सभागृह दणाणून सोडले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी लावून धरत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला. त्यानंतर विरोधकांकडून गोंधळ घालण्यास सुरूवात केल्यानंतर काँग्रेसचे आमदार नाना पटोले गृहमंत्र्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी सीडीआरचा मुद्दा उपस्थित करून थेट फडणवीसांचीच चौकशी करण्याची मागणी केली.

आज विधीमंडळाचे कामकाज सुरु झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीपासून मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा मुद्दा उचलून धरत सरकारवर ताशेरे ओढले. पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. फडणवीसांचा आक्रमकपणा पाहून शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा पुढे करण्यात आला. त्यावरून फडणवीस आणि अनिल परब यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. 

दहा मिनिटांनी कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात गृहमंत्री अनिल देशमुख हजर नव्हते. त्यावेळी फडणवीस यांनी ते येईपर्यंत कामकाज सुरू न करण्याची विनंती अध्यक्षांना केली. त्यावर आमदार नाना पटोले यांनी कामकाज सुरू करण्याची मागणी केली. गृहमंत्री येईपर्यंत कामकाज पुढे सुरू ठेवावे, असे ते म्हणाले. पण विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या स्पष्टीकरणाची मागणी उचलून धरण्याने सभागृह तहकूब करण्यात आले.

कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर देशमुख यांनी निवेदन केले. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडून केला जात आहे. विरोधी पक्षांकडे पुरावे असतील तर एटीएलला द्यावेत. कुणालाही पाठिशी घालणार नाही. एटीएसमध्ये सचिन वाझे नाहीत. त्यामुळे निपक्षपणे तपास केला जाईल, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. पण त्यावर फडणवीस यांचे समाधान झाले नाही. 

फडणवीस यांनी गृहमंत्र्यांवरच जोरदार टीका केली. गृहमंत्री वाझे यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच वाझे यांच्या अटकेची मागणीही केली. त्यानंतर सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. नाना पटोले यांनी त्यावर संताप व्यक्त केला. या गोंधळात नाना पटोले बोलण्यास उठले. त्यांनी थेट फडणवीस यांच्याकडील सीडीआरचा मुद्या उपस्थित केला. विरोधकांना सीडीआर कसा मिळाला, त्यांना तो अधिकार आहे का? त्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सभागृहामध्ये विरोधकांकडून कोविडच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणीही पटोले यांनी केली. 

पटोले यांच्या सीडीआरच्या मुद्यावर फडणवीस चांगलेच भडकले. त्यांनी मी सीडीआर मिळवल्याचे सांगत चौकशी करण्याचे आव्हान दिले. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com