करूणानिधींचे वारसदार ते तमिळनाडूचे भावी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन  - MK Stalin will be the next chief minister of tamilnadu | Politics Marathi News - Sarkarnama

करूणानिधींचे वारसदार ते तमिळनाडूचे भावी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन 

वृत्तसंस्था
रविवार, 2 मे 2021

तमिळनाडूच्या इतिहास दर पाच वर्षांनी सत्तापालट झाला आहे.

चेन्नई : तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेने घवघवीत यश मिळवले आहे. सुरूवातीचे कल डीएमकेच्या बाजूने असून बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे अण्णाद्रमुकला विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. या विजयाने दक्षिणेला डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांच्या रूपाने नव्या दमाचे राजकीय नेतृत्व मिळाले आहे. पुढील पाच वर्षे तेच तमिळनाडूच्या गादीवर बसणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

तमिळनाडूच्या इतिहास दर पाच वर्षांनी सत्तापालट झाला आहे. 1969 मध्ये करूणानिधी हे पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. त्याचवर्षी ते डीएमकेचे अध्यक्षही झाले. त्यानंतर 1971, 1989,1996 आणि 2006 असे पाचवेळा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत डीएमकेचा पराभव करत अण्णाद्रमुकने सत्ता मिळवली. जयललिता या मुख्यमंत्री बनल्या. पुन्हा 2016 च्या निवडणुकीतही जयललिता यांनी इतिहास रचत पुन्हा सत्ता मिळवली. 

याच कालावधीत करूणानिधी यांच्या प्रकृतीमुळे डीएमकेची सुत्रं स्टॅलिन यांच्याकडे आली. करूणानिधी यांचा मृत्यू 2018 मध्ये 94 व्या वर्षी झाला. त्यानंतर स्टॅलिन यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद आले. त्याआधी 2017 मध्ये ते कार्यकारी अध्यक्ष होते. तर 2009 मध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीही करण्यात आले होते. त्यांचे बंधू एमके. अलगिरी यांना जानेवारी 2014 मध्ये पक्षातून काढण्यात आले. त्यावेळी ते पक्षाचे सचिव होते. 

दोन्ही बंधूमध्ये राजकीय वर्चस्वावरून वाद निर्माण झाल्याने पक्षामध्ये अस्वस्थता होती. पण पक्षनेतृत्वाने स्टॅलिन यांच्यावर विश्वास दाखवत अलगिरी यांना बाहेरचा रस्ता रस्ता दाखवला. पक्षाची जबाबदारी हातात आल्यानंतर स्टॅलिन यांची यंदाची विधानसभा निवडणूक पहिलीच होती. पण 2019 च्या निवडणुकीतच त्यांचा करिष्मा दिसून आला. पक्षाने 38 जागांपैकी 37 जागांवर विजय मिळवत अण्णाद्रमुकला धुळ चारली. तिथेच स्टॅलिन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. 

आता विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या पक्षाने मिळवलेल्या यशाने दक्षिणेला नवीन राजकीय नेतृत्व मिळवून देणारे आहे. पक्षाने बहुमताचा आकडा पार केला असून द्रमुकचीच सत्ता येणार हे जवळपास निश्चित आहे. करूणानिधी यांच्यानंतर त्यांचे पुत्र स्टॅलिन हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनीही यंदाची निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख