दानवेंना घरात घुसून मारावं लागेल : बच्चू कडू - Minister of State Bachchu Kadu got angry over Raosaheb Danve statement | Politics Marathi News - Sarkarnama

दानवेंना घरात घुसून मारावं लागेल : बच्चू कडू

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

दानवे यांच्या या विधानानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.

मुंबई : 'उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनचा हात आहे,' असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतेचे केले आहे. दानवे यांच्या या विधानानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू हे दानवेंच्या विधानावर संतापले आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. अशा वातावरणात शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे असं म्हणणं शेतकऱ्याचा अपमान आहे. रावसाहेब दानवेच हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे यासाठी डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.  

दानवे हे मूळचे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे याची सर्वात आधी डीएनए चाचणी करावी लागेल, पुन्हा असे वक्त्यव्य त्यांनी करू नये. या आधी दानवे यांच्या घरावर आम्ही गेलो होतो, आता दानवेंना घरात घुसून मारावं लागेल का, असे बच्चू कडू म्हणाले.

"उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे आंदोलन हे शेतकऱ्यांचे म्हणूनच पाहिले पाहिजे. यामध्ये बाहेरील शक्ती असेल तर गृहविभागाने त्याकडे लक्ष दिले पाहिजे. पण, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे काय म्हणाले हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, ते भारतीय जनता पार्टीचे अधिकृत मत नाही," असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज केला आहे. 

फुलंब्री तालुक्यातील कोलते टाकळी येथील आरोग्य केंद्राचे उद्धाटन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  केलेल्या भाषणात दानवे यांनी कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेले आंदोलन आणि काल पुकारण्यात आलेला भारत बंद यावर देखील भाष्य केले.  

कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आश्चर्यजनक आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकताच केला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाय तुम्हाला तुमचा माल कुठेही नेऊन विकण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे. त्यामुळे तुम्हाला बाजार समितीचा आठ टक्के कर भरण्याची गरज नाही. पण या चांगल्या निर्णयाला देखील विरोध केला जात असल्याचेही दानवे म्हणाले होते.

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तान या बाहेरच्या देशांचा हात आहे. या आधी देशात सीसीए आणि एनआरसीचा कायदा करण्याचा निर्णय झाला, तेव्हा देखील या देशातील मुसलमांनाना देशाबाहेर जावे लागेल,अशी भिती निर्माण करण्यात आली. पण एका तरी मुसलमानाला देश सोडून जावे लागले का? असा सवाल दानवे यांनी केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख