संजय राठोड `डेंजर झोन`मध्ये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाराजी भोवणार - minister sanjay rathod in Danger zone may loose confidence of Uddhav Thaeckeray | Politics Marathi News - Sarkarnama

संजय राठोड `डेंजर झोन`मध्ये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाराजी भोवणार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

मुख्यमंत्र्यांनी बोलविली शिवसेना नेत्यांची बैठक

मुंबई : पोहरादेवी गडावर झालेल्या नियमबाह्य गर्दीमुळे वनमंत्री संजय राठोड यांचे मंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना राजीनाम्याचा आदेश देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानावर शिवसेना नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. त्यात राठोड यांचा विषय निघू शकतो. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर राठोड अडचणीत आले आहेत. पुणे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. विरोधकांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तरीही चौकशी झाल्याशिवाय राठोड यांच्याबाबत निर्णय घेणार नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोविडच्या संसर्गामुळे राज्यात गर्दीच्या ठिकाणी निर्बंध घातले होते. तरीही पोहरादेवी गडावर वनमंत्री संजय राठोड यांनी 23 फेब्रुवारी रोजी शक्तीप्रदर्शन केली. त्यामुळे वाशिम पोलिसांनी तब्बल 10 हजार जणांवर गुन्हा दाखल केला. या साऱ्या प्रकारामुळे  ठाकरे यांची मोठी नाराजी राठोड यांनी ओढवून घेतल्याचे सांगण्यात येते. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे यांची काल बैठक झाली. या बैठकीतही पवार यांनी राठोड प्रकरणाबबत नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. (`सरकारनामा`ने याची खातरजमा केलेली नाही.) तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीत राठोड यांच्या पोहरादेवी येथील वर्तनावरही चर्चा झाली. त्यानंतरच शिवसेनेने आपल्या नेत्यांची बैठक आज बोलविली. 

भाजपच्या नेत्यांनी राठोड प्रकरणी आक्रमकपणे भूमिका घेत सरकारवर टीका केली. चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांकडून पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाचा तपास काढून घेण्याची मागणी करत तो सक्षम अधिकाऱ्याकडे देण्याची मागणी केली. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेनेच्या भूमिकेवर टीका करताना संजय राऊत यांना लक्ष्य केले. ``एका संजयची बाजू दुसरा संजय पूर्णपणे सांभाळून घेत आहे. एरवी नको त्या विषयावरही सामनातून खरडत बसणारे संजय राऊत यांना संजय राठोडबद्दल काही लिहायला सुचत नाही की त्यांच्या पेनाची शाई संपली आहे, असा सवाल त्यांनी विचारला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख