Bhandara Medical Hospital
Bhandara Medical Hospital

मंत्री व त्यांचा स्टाफ सांत्वनासाठी भंडाऱ्यात आला, अन् चिकन-मटणवर ताव मारून गेला...

ज्यांनी कुणी विश्रामगृहावर आजची जेवणाची व्यवस्था केली, त्या अधिकाऱ्यांच्या संवेदना कुठे मेल्या, हा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. वेळ, काळ, प्रसंग याचा कुठलाही विचार न करता केवळ मंत्र्यांना आणि त्यांच्या टिमला खूष करण्यासाठी ज्यांनी कुणी हा आटापिटा केला, त्यामुळे खरंच मंत्र्यांना तरी बरे वाटेल का

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे आग लागून १० नवजात बाळांचा होरपळून, गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर अनेक गावांमध्ये चुलीदेखील पेटल्या नाहीत. त्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह बरेच मंत्री भंडाऱ्याला आले, विश्रामगृहावर थांबले, जेवले. पण कुणीही मांसाहार केला नाही. मात्र आज या विश्रामगृहावर चक्क देशी कोंबडे, मासे आणि झिंगे शिजले आणि आलेल्या लोकांनी त्यावर तावही मारला. 

राज्यातील कोणताही मंत्री जिल्ह्याच्या दोऱ्यावर आला की संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी मंत्र्यांसोबतच त्यांच्या पीएंची देखील बडदास्त ठेवण्यात कुठलीही कसर बाकी ठेवत नाहीत. येवढेच काय तर मंत्र्यांच्या वाहनचालकांची देखील ‘हाजी हाजी’ केली जाते. एरवी हे सर्व ठीक आहे, पण शनिवारी भंडाऱ्यात कोणती घटना घडली, त्यानंतर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यात काय वातावरण आहे, याचेही भान आज ठेवण्यात आले नाही. रुग्णालयांची काय अवस्था आहे, मृतक बाळांच्या घरी काय परिस्थिती आहे, याची पाहणी करण्यासाठी आणि पीडितांचे सांत्वन करण्यासाठी राज्यातील मंत्री येत आहेत. याचे तरी भान ठेवून त्यांच्या जेवण्यासाठी काय व्यवस्था केली पाहिजे, याचा विचार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. 

व्हिडिओ झळकले सोशल मिडियावर
आज विश्रामगृहावर काही कर्मचारी चिकन, मासे आणि झिंग्यांवर ताव मारतानाचे व्हिडिओ सोशल मिडियावर झळकल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. एकच चर्चा सुरू झाली की जिल्ह्यावर येवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असताना, अजूनही जिल्ह्याच्या काही गावांमध्ये घरांतील चुलीदेखील पेटलेल्या नाहीत आणि समाजाचे रक्षक म्हणवणारे मिटक्या मारत मांसाहार कसा काय करू शकतात. मृत नवजात बाळांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेले लोक येवढे कसे असंवेदनशील असू शकतात, हाच प्रश्‍न आज जिल्हावासीयांना पडला आहे. 

करणाऱ्यालाच कळायला हवे…
ज्यांनी कुणी विश्रामगृहावर आजची जेवणाची व्यवस्था केली, त्या अधिकाऱ्यांच्या संवेदना कुठे मेल्या, हा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. वेळ, काळ, प्रसंग याचा कुठलाही विचार न करता केवळ मंत्र्यांना आणि त्यांच्या टिमला खूष करण्यासाठी ज्यांनी कुणी हा आटापिटा केला, त्यामुळे खरंच मंत्र्यांना तरी बरे वाटेल का, याचा विचार व्हायला हवा होता. बाकी काहीही असो गरिबाचं काय हाय भौ, जगले काय आन मेले काय.. गरिबाच्या जिवाची किंमत कोनालेच नाही भौ’, काल-परवा एका मृत बाळाच्या बापाने दिलेली ही प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते.  
Edited By : Atul Mehere
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com