मायक्रोसॉफ्टने दिली कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची मुभा !  - Microsoft allows permanent work from home! | Politics Marathi News - Sarkarnama

मायक्रोसॉफ्टने दिली कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची मुभा ! 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

आता याच सुविधेचा आणखी विस्तार करत कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरातूनच काम करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे.

ह्युस्टन : जगभरात कोरोनाचे संकट अजूनही कमी झाले नाही. त्यामुळे कोरोनाबाबत अजूनही काळजी घेतली जात आहे. भारतासह अनेक देशातील मोठ्या उद्योग समूहाचे कर्मचारी घरातून काम करीत आहेत. आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या मायक्रोसॉफ्टने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची (घरून काम) सुविधा उपलब्ध करून दिली होती. 

आता याच सुविधेचा आणखी विस्तार करत कंपनीने काही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरातूनच काम करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून या नव्या कार्यप्रणाली संदर्भात काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. 

या नव्या कार्यप्रणालीनुसार कर्मचाऱ्यांसाठी कामाची पद्धत आणखी सोईस्कर करण्यात आली असून देशात कोठेही राहून त्यांना काम करणे शक्‍य होणार आहे. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठवडाभरात पन्नास टक्‍क्‍यांपेक्षाही कमी काम करण्याची मुभा देण्यात आली असून व्यवस्थापक कायमस्वरूपी घरातूनच काम करू शकतील. 

कोरोना संसर्गाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना त्यांचे कार्यस्थळ, परिसर आणि कामाचे तास यांच्यात बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. कार्यालये पूर्ण क्षमतेने उघडत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने काम करण्यात येईल, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कामाचे ठिकाण बदलू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यासाठी लागणारे पैसे मात्र स्वत:च्या खिशातून खर्च करावे लागणार आहेत. कायमस्वरूपी घरातूनच काम करणाऱ्यांचा खर्च मात्र मायक्रोसॉफ्ट करेल. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीने काम करण्यासाठी व्यवस्थापकांची परवानगी घेण्याची आवश्‍यकता भासणार नाही, असेही कंपनीकडून सांगण्यात आले. 

कर्मचाऱ्यांना घरून काम करणे अधिक सोपे व्हावे म्हणून आम्ही त्यामध्ये आणखी लवचिकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. हे करताना उद्योगांची गरज आणि कार्यसंस्कृती यांचा समन्वय साधण्यात आला आहे मायक्रोसॉफ्टच्या चीफ पीपल ऑफिसर कॅथलिन होगन यांनी सांगितले. 

ॉकोरोनामुळे काम करण्याची शैलीच पूर्णपणे बदलली असून कर्मचाऱ्यांसाठी सोयीचे ठरतील असे काही बदल आम्ही घडवून आणले आहेत. आता दिवसभर कर्मचाऱ्यांनी काम करणे ही अट राहिलेली नाही असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नादेला यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख