बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब हवे होते..

शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'सामना'तून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
balasaheb24.jpg
balasaheb24.jpg

मुंबई : मुंबईत काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. याच पार्श्वभूमीवर शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'सामना'तून बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. रोखठोकमधून त्यांनी बेळगाव प्रश्न, बाळासाहेब ठाकरे, एस. एम. जोशी, शरद पवार, छगन भूजबळ यांचे बेळगाव आंदोलन याविषयी भाष्य केलं आहे. 

"बाळासाहेब ठाकरे हे एक अफाट व्यक्तिमत्त्व. आज ते हवेच होते. पंजाबच्या शेतकऱ्य़ांची साठ दिवस टोलवाटोलवी सुरू आहे. ते पाहिल्यावर अनेकांना वाटलं सरकारचे कान उपटून हातात द्यायला बाळासाहेब हवे होते. त्यांच्या आठवणीने आजही महाराष्ट्र आणि देश रोमांचित होऊन उठतो. कारण देश पेटविण्याची किमया त्यांनी वारंवार केली. आज असे नेतृत्व दिसत नाही," अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

बेताल राज्यकर्त्यांना वेसण घालण्यासाठी आज बाळासाहेब ठाकरे हवे होते. ‘हम करे सो कायदा’ ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी बाळासाहेब हवेच होते. नोटाबंदी, लॉक डाऊनसारख्या संकटांनी हतबल झालेल्या सामान्य माणसाला बळ देण्यासाठी बाळासाहेब हवे होते, असे राऊत यांनी सांगितले आहे. 

पिढी बदलली तरी बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव जनमानसावर कायम आहेच. बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे उभे राहतील, त्यांच्या नावाने शासकीय इमारती व योजना निर्माण होतील, त्यांच्या स्मारकांची पायाभरणी होत राहील, त्यांच्या नावाने यापुढेही मते मागितली जातील, पण या सगळ्याची गरज बाळासाहेबांना कधीच भासली नाही. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभे राहिले नसते म्हणून रामाचे नाव, श्रद्धा लोक विसरले असते काय? खरे राममंदिर बाहेर आहे, ते लोकांच्या मनात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे तेच आहे, असे राऊत यांनी म्हटलं आहे.  
  

आज मोदी-शहांची आरती गाणारे मुंबईतील गुजराती बांधव 1992 नंतर बाळासाहेबांचे भक्त झाले. ‘‘बाळासाहेब होते म्हणून आमच्या लेकी-सुनांची इज्जत वाचली’’ असा डंका हे व्यापारी लोक जगभर पिटत होते. कारण बाळासाहेबांचे हिंदुत्व फक्त पोथीपुराण, शेंडी-जानव्याचे नव्हते. ते अंगावर येणाऱ्य़ाचा कोथळा काढणाऱ्य़ा तळपत्या तलवारीचे होते. बाळासाहेबांनी शूरवीर घडवले व शूरांचे नेतृत्व केले. त्यामुळे पाठीत वार करण्याची त्यांना कधी गरजच पडली नाही. इतका खुल्लमखुल्ला, दिलदार मनाचा नेता देशाच्या इतिहासात झाला नसेल, अशा शब्दात बाळासाहेब यांचा गैारव रोखठोकमध्ये केला आहे.

'रोखठोक' मध्ये काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी...

जिवंतपणी कोणत्याही कोर्टाची पर्वा बाळासाहेबांनी केली नाही. बाळासाहेब त्यांच्या खुर्चीवर बसले की, कोर्ट सुरू. बाळासाहेबांचा शब्द म्हणजे न्याय हे कित्येक वर्षे महाराष्ट्राने आणि देशाने अनुभवले आहे. 20 तारखेला मी कारवारला होतो. ज्या बेळगाव-कारवारसाठी महाराष्ट्र आजही लढत आहे, तोच हा भाग. प्रवासात सोबत शरद पवार आणि ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे होते. बेळगावचा लढा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी निघाल्या. बेळगावसह सीमा भागासाठी 69 हुतात्मे देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष. बाळासाहेबांनी तीन महिन्यांचा तुरुंगवास याकारणी भोगला. 1 जून 1986 पासून कर्नाटक सरकारने सीमा भागात कन्नडची सक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात वातावरण तापले. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची कोल्हापुरात बैठक झाली. एस. एम. जोशी, शरद पवार, एन. डी. पाटील, बाळासाहेब ठाकरे असे नेते त्या बैठकीत होते. प्रमुख नेत्यांनी बेळगावात जाऊन आंदोलन करावे असे ठरले. या आंदोलनाची सुरुवात बाळासाहेबांनी करावी यावर खल झाला, पण बाळासाहेबांनी जाऊ नये असे ठरले. एकतर कन्नड पोलिसांचा बाळासाहेबांवर राग होता. पोलीस बाळासाहेबांशी नीट वागणार नाहीत, काही वेडेवाकडे घडले तर महाराष्ट्र पेटेल. त्यामुळे शरद पवार आधी गेले. कन्नड पोलिसांनी त्यांना चोप दिला व अटक केली. शिवसेनेतर्फे बेळगावात घुसण्यासाठी बाळासाहेबांनी मुंबईचे महापौर असलेल्या छगन भुजबळ यांची निवड केली. भुजबळ इक्बाल शेख नावाने वेषांतर करून बेळगावातील राणी चेनम्मा चौकात गेले. तेथे कानडी पोलिसांनी त्यांना निर्घृणपणे मारले. बराच काळ ते तुरुंगात होते. हे सर्व प्रसंग कारवारच्या भूमीत पुन्हा आठवले. बाळासाहेबांना हात लागला तर महाराष्ट्र पेटेल हा धाक तेव्हाही होता. त्याचे नंतर दहशतीत रूपांतर झाले. महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून ‘देश पेटेल’ इथपर्यंत विषय गेला. ठाकरे नावाचीच ही जादू होती.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com