"माझ्या आत्महत्येस विनोद शिवकुमार हेच जबाबदार" : दिपाली चव्हाण - Melghat Women Forest Officer Deepali Chavan suicide Vinod Shivkumar | Politics Marathi News - Sarkarnama

"माझ्या आत्महत्येस विनोद शिवकुमार हेच जबाबदार" : दिपाली चव्हाण

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 मार्च 2021

दिपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये विनोद शिवकुमार यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे.

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी काल हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिपाली चव्हाण यांना उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपाली चव्हाण यांना त्यांनी झापल्याची माहिती आहे.

दिपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईट नोटमध्ये विनोद शिवकुमार यांना आत्महत्येस जबाबदार धरले आहे. दिपाली चव्हाण यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हे आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचे म्हटले आहे. 

"माझ्या आत्महत्येस विनोद शिवकुमार हेच सर्वस्वी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी हीच माझी शेवटची इच्छा आहे," असे दिपाली चव्हाण यांनी सूसाईट नोटमध्ये लिहिलं आहे. "माझे रोखलेले वेतन माझ्या मृत्यूनंतर माझ्या आईला द्या, विनोद शिवकुमार यांच्याबाबत आपल्याकडे खूप तक्रारी आहेत. त्या गांर्भीयाने घ्या," असे चव्हाण यांनी रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.  
  
"शिवकुमार यांच्याकडे काही जणांनी माझ्याविरोधात तक्रारी केल्या. त्याची शहानिशा न करता शिवकुमार मला निंलबित करण्याची धमकी देत होते. माझ्याकडे तीन गावांच्या पूऩर्वसनाचे काम होते. या कामाविषयी माझी बाजू ते ऐकून न घेता. ते मला शिवीगाळ करीत होते. मागील आठवड्यापासून ते वारंवार हरिसाल येथे येत आहेत. मला खूप वाईट बोलतात. यांचा मला खूप मानसिक त्रास होत आहे," असे चव्हाण यांनी पत्रात म्हटलं आहे.   

रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणार्‍या आणि 'लेडी सिंघम' म्हणून ओळखल्या जाणार्‍या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण (वय 28 वर्ष) यांनी काल रात्री हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. धारणी तालुक्यातील हरिसाल येथे व्याघ्र प्रकल्पाच्या शासकीय निवासात दिपाली चव्हाणचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

दिपाली चव्हाण या या महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत २०१५ मध्ये उत्तीर्ण झाल्या होत्या. त्या मुळच्या मराठवाड्यातील रहिवासी होत्या. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गुगामल वन्यजीव विभागात हरिसाल येथे गेल्या पाच वर्षांपासून त्या कार्यरत होत्या. एक कर्तव्यकुशल व तडफदार अधिकारी असलेल्या दिपाली चव्हाण दोन वर्षांपूर्वीच राजेश मोहिते यांच्यासोबत विवाह बंधनात अडकल्या होत्या. राजेश मोहिते हे अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळीचे मूळ रहिवासी असून अमरावती जिल्हा कोषागार कार्यालय येथे शासकीय सेवेत कार्यरत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख